कुरखेडा तालुक्यात ग्रामसेवकाची बनावट " आयडी " वापरून घरकुल लाभार्थ्यांच्या वाळूवर दिल्लीतील कंत्राटदाराचा डल्ला. 📍 ४०० ब्रास वाळू उपसा.घरकुल लाभार्थ्यांची रेती दिल्लीच्या कंत्राटदाराला.महसूल विभागावर गंभीर आरोप ; तहसीलदारांच्या भूमिकेवर संशय.

कुरखेडा तालुक्यात ग्रामसेवकाची बनावट " आयडी " वापरून घरकुल लाभार्थ्यांच्या वाळूवर दिल्लीतील कंत्राटदाराचा डल्ला. 


📍 ४०० ब्रास वाळू उपसा.घरकुल लाभार्थ्यांची रेती दिल्लीच्या कंत्राटदाराला.महसूल विभागावर गंभीर आरोप ; तहसीलदारांच्या भूमिकेवर संशय.


एस.के.24 तास 


कुरखेडा : प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि शासकीय नियमांची पायमल्ली कशा प्रकारे केली जाऊ शकते,याचे धक्कादायक उदाहरण कुरखेडा तालुक्यात उघडकीस आले आहे.घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव असलेली वाळू जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता चक्क एका खासगी कंत्राटदाराच्या घशात घालण्यात आली आहे. 


विशेष म्हणजे, यासाठी एका ग्रामसेवकाची बनावट महाखनिज आयडी वापरून ४०० ब्रास वाळू उपसा केल्याचा प्रकार समोर आला असून, यात महसूल विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.


माहिती अधिकारातून घोटाळा उघड : - 


माहिती अधिकारात मिळालेल्या पुराव्यांनुसार, गुरनोली येथील सती नदी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सर्व सूत्रे कंत्राटदाराच्या फायद्यासाठी वापरण्यात आली. महाखनिज पोर्टलवर एका ग्रामसेवकाची बनावट युजर आयडी तयार करून त्याद्वारे ४०० ब्रास वाळू उचलण्याची प्रक्रिया पार पाडली गेली. ज्या ग्रामपंचायतीच्या नावावर ही आयडी तयार झाली, त्या ग्रामपंचायतीला वाळूचा अर्ज किंवा भरलेल्या ३ लाख रुपयांच्या महसुलाबाबत कोणतीही कल्पना नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. हा सर्व खटाटोप दिल्लीस्थित एका कंत्राटदाराला लाभ पोहोचवण्यासाठी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.


तहसीलदारांच्या भूमिकेवर संशय : - 


राज्य शासनाच्या नवीन वाळू धोरण २०२५ नुसार घरकुल लाभार्थ्यांना प्राधान्याने रेती मिळणे अपेक्षित असताना, येथे मात्र कंत्राटदारासाठी पायघड्या घातल्या गेल्या आहेत. कुरखेडा तहसीलदार राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच वाळू उपशाचे परवाने दिल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कंत्राटदाराच्या बेकायदेशीर कृत्याला महसूल विभागाचे पाठबळ लाभल्यानेच हा उपसा सुरू असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नासीर हाश्मी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.


फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी : - 


या प्रकरणाची विभागीय चौकशी करून दोषी महसूल कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच संबंधित कंत्राटदाराकडून दुप्पट दंड वसूल करावा,अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार राहुल पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी असे काही घडू शकत नाही असे सांगत अधिक बोलणे टाळले आणि नायब तहसीलदारांकडे बोट दाखवून या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे टाळले.आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !