गडचिरोली - चंद्रपूर मार्गावर थरार धावत्या ई - बसला भीषण आग क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडून पूर्णतः जळून खाक.



गडचिरोली - चंद्रपूर मार्गावर थरार  धावत्या ई - बसला भीषण आग क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडून पूर्णतः जळून खाक.


📍 43 प्रवाशांची सुखरूप सुटका जीवितहानी टळली.


एस.के.24 तास 


चंद्रपूर : गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई - बसला (दि, 08/05/2026 शुक्रवार ला  दुपारी अचानक भीषण आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.सुदैवाने चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व 43 प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले आणि मोठी जीवितहानी टळली.काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडून पूर्णतः जळून खाक झाली.


ही घटना दुपारी 4 ते 5 वा.च्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील घंटाचौकीजवळ घडली. गडचिरोलीहून चंद्रपूरकडे निघालेली 9 मीटर ई - बस (क्रमांक,MH.49 BZ 4187) मूल बसस्थानकावरून प्रवाशांना घेऊन पुढे रवाना झाली होती.बस भरधाव वेगात असताना चालकाच्या निदर्शनास स्टेअरिंग जवळून धूर निघत असल्याचे आले.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली.


वाहक आणि चालकाने क्षणाचाही विलंब न लावता सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर उतरवले.उन्हाच्या तीव्र झळांमुळे बसने काही क्षणांतच पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले.बघता बघता संपूर्ण बस ज्वाळांनी वेढली गेली.प्रवाशांनी हा थरार उघड्या डोळ्यांनी अनुभवला.घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन,अग्निशमन दल तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 


अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ई-बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाडाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले असून त्याचा परिणाम वाहनांवरही होत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. बसला आग लागल्यामुळे चंद्रपूर - मूल मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !