करारनाम्याशिवायच सुरू तेंदूपत्ता फळी सिरोंचा तालुक्यात मजुरांच्या मेहनतीवर दरोडा.मजुरी थकावून ठेकेदार फरार. 📍प्रशासन आणि वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह बेजबाबदार ठेकेदारांवर कडक कारवाईची मागणी.

करारनाम्याशिवायच सुरू तेंदूपत्ता फळी सिरोंचा तालुक्यात मजुरांच्या मेहनतीवर दरोडा.मजुरी थकावून ठेकेदार फरार.


📍प्रशासन आणि वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह  बेजबाबदार ठेकेदारांवर कडक कारवाईची मागणी.


एस.के.24 तास 


सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोणताही अधिकृत करारनामा न करताच तेंदूपत्ता फळी सुरू असल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. काही कंत्राटदार स्थानिक अडाणी आणि गरीब मजुरांशी कोणताही लेखी करार न करता, अत्यंत कमी दरात तेंदूपत्ता तोडून घेत असून यामुळे गरीब आदिवासी मजुरांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही ठेकेदार तेंदूपत्ता संकलनानंतर मजुरांना केवळ काही रक्कम देतात आणि उर्वरित मजुरी नंतर देण्याचे आश्वासन देऊन थकावतात. अनेक गावांमध्ये अजूनही मजुरांची जुनी मजुरी बाकी असल्याची तक्रार आहे. 

काही प्रकरणांमध्ये तर कंत्राटदार फळी सोडून फरार झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. या प्रकारामुळे सिरोंचा तालुक्यातील गरीब व आदिवासी जनतेसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अधिकृत करारनामा नसतानाही कंत्राटदारांना जंगल क्षेत्रात काम करण्याची परवानगी कशी दिली जाते? त्यांना आवश्यक मंजुरी कशी मिळते? याबाबत आता वनविभागाच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली जात आहे. यात काही अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांशी संगनमत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

आंदोलनाचा इशारा : -

ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते रविकुमार कार्सपल्ली यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. " संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून मजुरांची ही लूट थांबवावी आणि बेजबाबदार ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा ठेकेदार आणि संबंधित प्रशासनाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा त्यांनी दिला आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !