रायगुडम येथे तेंदूपत्ता मजुरांवर वीज कोसळली एकाचा मृत्यू,दोन जखमी.
📍ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप ; मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
एस.के.24 तास
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील रायगुडम येथील इंद्रावती नदी परिसरात गुरुवारी सायंकाळी निसर्गाचा कहर पाहायला मिळाला.तेंदूपत्ता पडीवर बोध भराईचे काम करणाऱ्या मजुरांवर अचानक आलेल्या वादळासह वीज कोसळल्याने एक मजूर जागीच ठार झाला,तर अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,रायगुडम नदीकाठावर तेंदूपत्ता पडीवर मजूर बोध भराईच्या कामात व्यस्त होते.सायंकाळी साधारण पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान अचानक हवामानात बदल झाला.जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह आकाशीय वीज कोसळली आणि मजूर तिच्या तडाख्यात सापडले.
ही घटना इतकी भीषण होती की एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर दोन मजूर गंभीररीत्या भाजले गेले. घटनेनंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी छत्तीसगड राज्यातील भोपालपटनम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जगदीश मांदाळे (वय ४४) आणि कोमल दिलीप मांदाळे यांना पुढील उपचारासाठी बीजापूर रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
सदर तिन्ही मजूर हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्याचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे.घटनेच्या वेळी पातागुडमचे माजी उपसरपंच मल्लेश दुर्गम हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनाही विजेचा सौम्य झटका बसला असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तेंदूपत्ता ठेकेदार संगीता मनोज जैन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातून आणलेल्या मजुरांसाठी रायगुडम येथील इंद्रावती नदीच्या रेती परिसरात कोणतीही सुरक्षित निवास व्यवस्था करण्यात आली नव्हती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ना राहण्याची सोय, ना खराब हवामानापासून संरक्षण त्यामुळेच एका गरीब मजुराला जीव गमवावा लागल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभावामुळे ही दुर्दैवी घटना घडली.
ग्रामस्थांनी आणखी एक गंभीर आरोप करताना सांगितले की, पेंडलया, पातागुडम आणि रायगुडम गावांतील स्थानिक आदिवासी मजुरांना यंदाही काम देण्यात आले नाही.त्याऐवजी बाहेरील मजूर आणण्यात आले.त्यामुळे स्थानिक आदिवासी मजूर रोजगार आणि आर्थिक हक्कांपासून वंचित राहत असून त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

