कुरखेड्यात गावगुंडांचा थरार ; भर चौकात काका - पुतण्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला..!
📍चार आरोपी फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू.
एस.के.24 तास
कुरखेडा : उधारीच्या पैशासाठी तगादा लावला म्हणून एका युवकाने दोन गावगुंडांच्या मदतीने काका-पुतण्यावर लोखंडी रॅाडने जीवघेणा हल्ला केला. गजबजलेल्या फवारा चौकात घडलेल्या या थरारनाट्याने कुरखेडा हादरून गेले. याप्रकरणी तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार,वडसा येथील रहिवासी शुभम कृष्णाजी आंबेकर (वय 30 वर्ष, व्यवसाय - शेती) यांनी 17 जुलै 2025 रोजी आरोपी विनोद श्रावण खंडाईत याच्या सांगण्यावरून आणि गरजेपोटी त्याच्या बँक खात्यात 1 लाख रुपये ऑनलाईन पाठवले होते. “ महिनाभरात पैसे परत करतो,” असे आश्वासन विनोदने दिले होते.
मात्र त्यानंतर शुभम आंबेकरने 3 ते 4 वेळा पैशांची मागणी करूनही विनोदने पैसे देण्यास टाळाटाळ केली.शेवटी कंटाळून शुभमने हा प्रकार आपले काका घनशाम वासुदेव आंबेकर (रा.कोसी) यांना सांगितला.शनिवार दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास शुभम व त्याचे काका कुरखेडा येथील विनोदच्या ‘ अपना पानठेला ’ येथे गेले.
तिथे विनोदचा भाऊ विकास खंडाईत हजर होता. त्याने “ विनोद गडचिरोलीला गेला असून,पैशांसाठी तुम्ही सायंकाळी या,” असे सांगून त्यांना परत पाठवले.ठरल्याप्रमाणे सायंकाळी 7 ते 7:30 च्या सुमारास शुभम आणि त्याचे काका पुन्हा पानठेल्यावर पोहोचले.
तिथे विनोद आणि विकास दोघेही हजर होते. शुभमने आपले पैसे मागताच दोघांनीही अचानक रुद्रावतार धारण केला.पैसे देण्याऐवजी आरोपींनी अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एकही रुपया देणार नाही आणि तुला आज जिवंत सोडणार नाही, असे ओरडत विनोदने शुभमची कॉलर पकडून त्याला जोरात ढकलले.
त्याच वेळी विनोदने इशारा करताच बाजूला दबा धरून बसलेले अरबाज आणि परवेज नावाचे दोन गावगुंड समोर आले.त्यांनी हातात लोखंडी रॉड घेतला होता. क्षणातच त्यांनी शुभमच्या डोक्यावर लोखंडी रॉडने सपासप वार केले.या हल्ल्यात शुभमच्या डोक्यातून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या आणि तो जमिनीवर कोसळला.
पुतण्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून काका घनशाम आंबेकर हे त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडले.क्रूर हल्लेखोरांनी त्यांच्यावरही दया दाखवली नाही. त्यांनी घनशाम यांच्याही डोक्यावर आणि हातावर लोखंडी रॉडने जबर प्रहार केले, त्यामुळे तेही गंभीर जखमी झाले.
मुख्य आरोपी विनोदने खाली पडलेल्या दोघांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि एकाच्या हातातील रॉड हिसकावून शुभमच्या उजव्या खांद्यावर मारला.
“ पुन्हा कुरखेड्यात दिसलास तर जिवंत कापून टाकीन,” अशी धमकी देऊन हल्लेखोर पसार झाले. सुदैवाने आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केल्यामुळे दोघांचे प्राण वाचले. नागरिकांनी त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे दाखल केले.
जखमी शुभम आंबेकर याने दिलेल्या लेखी जबाबावरून कुरखेडा पोलिसांनी मध्यरात्री आरोपी विनोद श्रावण खंडाईत,विकास खंडाईत,अरबाज आणि परवेज यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 109 (खुनाचा प्रयत्न), 118(1) (घातक शस्त्राने गंभीर दुखापत), 351(2), 352 (गुन्हेगारी धमकी) आणि 3(5) (समान उद्देशाने कट रचणे) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
भरचौकात घडलेल्या या थरारक हल्ल्यामुळे कुरखेडा परिसरात व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पुढील तपास कुरखेडा पोलीस करत असून फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

