नववधूचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लग्न सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी नववधूचा मृत्यू.
📍लग्न मांडवातून निघाली अंत्ययात्रा काळीज पिळवटून टाकणारी घटना.
एस.के.24 तास
सोलापूर : लग्न सोहळा होऊन 24 तास ही उलटत नाहीत,तोच नववधूचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना माळशिरस तालुक्यात बाभूळगाव येथे घडली.त्यामुळे संपूर्ण गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
बाभूळगाव येथील हरिदास पराडे यांचा मुलगा समीर याचा विवाह सोहळा माढा तालुक्यातील घोटी येथील बाळासाहेब गळगुंडे यांची कन्या जानकी हिच्याशी झाला होता. पराडे आणि गळगुंडे दोन्ही कुटुंबीयांत या लग्न सोहळ्यामुळे आनंदाचे वातावरण होते.
नीरा नृसिंहपुर येथील एका मंगल कार्यालयात हा दिमाखदार विवाह पार पडल्यानंतर नववधू जानकी सायंकाळी सासरी लक्ष्मीच्या पावलांनी आली. देवदर्शन व इतर विधी आटोपले. घरासमोरील मांडवात नातेवाईकांची रेलचेल सुरूच होती.
नववधू जानकी आपल्या अंगावरील वधूचा पारंपरिक पोशाखासह नटलेली असताना दुसऱ्या दिवशी सकाळी अचानकपणे तिच्या छातीत कळा येऊन दुखणे वाढले. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता नववधूला तात्काळ जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अकलूजच्या डॉक्टरांच्या रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच नववधूला मृत्यूने गाठले.
सासरच्या सुनेच्या आणि माहेरच्या लेकीच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे दोन्ही कुटुंबांना धक्का बसला आहे. लग्नाच्या मांडवातूनच नववधू जानकी हिची अंत्ययात्रा निघाली. तेव्हा सर्वांची मने दुःखाने ओथंबून गेली होती.