राजकीय नेत्यांचे गाड्या सोडता,माझेच ट्रॅक्टर का पकडता ? ” युवकाचा सवाल. ★ युवा ट्रॅक्टर मालकाने स्वतःस पेटवून घेण्याचा तहसील कार्यालयातील घटनेचा थरार.

राजकीय नेत्यांचे गाड्या सोडता,माझेच ट्रॅक्टर का पकडता ? ” युवकाचा सवाल.


युवा ट्रॅक्टर मालकाने स्वतःस पेटवून घेण्याचा तहसील कार्यालयातील घटनेचा थरार.


एस.के.24 तास


वर्धा : सध्या सर्वत्र वाळू माफियाची सर्वाधिक चर्चा होत असते.तसेच त्यांनी अधिकारी वर्गावर केलेली बळजोरीचे पण किस्से गाजतात.येथे मात्र अधिकारी वर्ग अन्याय करीत असल्याचा आरोप करीत एका युवा ट्रॅक्टर मालकाने स्वतःस पेटवून घेण्याचा थरार घडला आहे. हिंगणघाट तहसील कार्यालयातच ही घटना आज घडली. पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव छोटू दिलीप वानखेडे असे आहे.

आज हिंगणघाट तहसील कार्यालयात ही घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.त्याच्या मते मी बेरोजगार युवक आहे.व्याजाने पैसे घेऊन ट्रॅक्टर घेतला.

त्यातून व्यवसाय सूरू केला. मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांनी माझे जगणे कठीण करून टाकले आहे.मी वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतो. पण अधिकारी माझाच ट्रॅक्टर पकडतात.अन्य वाळू वाहक ट्रॅक्टरवाले बिनधास्त धंदा करीत आहे. 

कारण त्यांना राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आहे. त्यांना सूट मिळते तर माझ्यावर नेहमी ट्रॅक्टर पकडण्याची कारवाई केल्या जात असते. हिंगणघाट महसूल प्रशासन कोणत्या राजकीय नेत्याच्या दबावात काम करते ? असा सवाल छोटू वानखेडे याने निवेदनातून केला.

आज दुपारी त्याने तहसील कार्यालय गाठले. भावना व्यक्त केली. आणि लगेचच पिशवीतून पेट्रोलची कॅन काढून त्यातील पेट्रोल अंगावर ओतले. आगपेटीची काडी काढून पेटवून घेणार तोच उपस्थित कर्मचाऱ्यांनी सावध होत त्यास पकडून ठेवले. 

प्रशासन मला आत्मदहन करण्यास भाग पाडत आहे, असा आरोप पण त्याने केला. मी जगू तरी कसा, असाही त्याचा सवाल आहे. आपली आर्थिक स्थिती बिघडली असून ट्रॅक्टर पकडण्याच्या कारवाईमुळे त्रस्त झाल्याचे त्याने नमूद केले.

गेल्या काही वर्षात हिंगणघाट तालुका वाळू माफियाच्या हैदोसने गाजू लागला आहे. मधल्या काळात वाळू चोरीच्या घटना वारंवार घडू लागल्याने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली होती.वणा नदीवरील वाळूचा अवैध उपसा मात्र परत चर्चेत आला. 

त्यातच राजकीय वरदहस्त असल्यानेच वाळू चोरी होत असल्याचे जाहीर आरोप पण झाले. आता महसूल खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. आजच्या पेटवून घेण्याच्या घटनेने परत वाळू चोरी व राजकीय पाठबळ याची चर्चा सूरू झाली आहे. 

या प्रकरणी छोटू वानखेडे यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच हिंगणघाट पोलीस यातील तथ्य तपासण्यास चौकशी करीत असल्याचे सांगण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !