महसूल विभाग कोमात - वाळू माफिया जोमात.! देऊळगाव व डोंगरसावंगी दोन घाटावर ही कारवाई चार जणांना अटक ; १ कोटी ४५ लाख ७४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त. 📍मुख्य सूत्रधार शुभम निंबेकर पोलिसांना गुंगारा देऊन फरार ; यामुळे महसूल विभाग पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात.

महसूल विभाग कोमात - वाळू माफिया जोमात.!

देऊळगाव व डोंगरसावंगी  दोन घाटावर ही कारवाई  चार जणांना अटक ; १ कोटी ४५ लाख ७४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त.


📍मुख्य सूत्रधार शुभम निंबेकर पोलिसांना गुंगारा देऊन फरार ; यामुळे महसूल विभाग पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात.


एस.के.24 तास


आरमोरी : आरमोरी तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वाळू तस्करीवर १० जूनरोजी मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दाणाणले आहे.देऊळगाव आणि डोंगरसावंगी या दोन घाटावर ही कारवाई करण्यात आली.यावेळी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून १ कोटी ४५ लाख ७४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामागचा मुख्य सूत्रधार शुभम निंबेकर फरार झाला. यामुळे महसूल विभाग पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात सापडला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरमोरी तालुक्यातील देऊळगाव आणि डोंगरसावंगी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, १० जूनच्या मध्यरात्री आरमोरी पोलिसांनी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापा टाकला.


डोंगरसावंगी येथील रेतीघाटावर कारवाईदरम्यान, ६० लाख रुपये किमतीची एक पोकलेन मशीन आणि २५ लाख रुपये किमतीचा एक ट्रक आढळून आला. या ट्रकमध्ये ६,७५० रुपये किमतीची १० ब्रास रेती भरलेली होती. पोलिसांनी ही पोकलेन मशीन, ट्रक आणि रेती असा एकूण ८५ लाख ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळावरून ऋषी सितकुरा राऊत (रा. डोंगरसावंगी), विकेशकुमार चंद्रसिंग (रा.मोहाड, जि. यवतमाळ) आणि रुपेश अजित शेख (रा.वर्धा) या तिघांना अटक करण्यात आली.


त्याचवेळी, देऊळगाव येथील वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या दुसऱ्या रेतीघाटावरही पोलिसांनी छापा टाकला. तेथेही पोकलेन मशीनद्वारे रेतीचा उपसा करून ती जमा केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी येथून ६० लाख रुपये किमतीची पोकलेन मशीन आणि ६७ हजार ५०० रुपये किमतीची १०० ब्रास रेती असा एकूण ६० लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत मोहम्मद तौकिर अब्दूल हसन (रा. अखेरतपूर, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली.


राजकीय नेत्यांचा सहभाग ?


या दोन्ही प्रकरणांमध्ये रेतीघाटाचा मालक शुभम अरुण निंबेकर (रा.आरमोरी) हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून,त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला असून,पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.या घाटांमध्ये काही राजकीय नेत्यांच्या सहभाग असल्याची चर्चा आहे.त्यामुळे कारवाई दरम्यान एका मोठ्या नेत्याने पोलिसांना फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. 


अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


महसूल विभाग संशयाच्या फेऱ्यात : - 


गेल्या दोन वर्षापासून शेतीघाटाच्या नावावर हे वाळू घाट सुरु आहे. मात्र हे वाळू तस्कर थेट नदीत मोठमोठे मशीन टाकून वाळू उपसा करीत आहेत. यामुळे शासनाचा कोट्य कोट्यवधींचा महसूल बुडाला. तरीसुद्धा महसूल विभागाने या विरोधात कधीच कारवाई केली नाही. दीड वर्षांपूर्वी याच परिसरात " एलसीबी " ने वाळू तस्करांविरोधात मोठी कारवाई केली होती. तेव्हा देखील महसूल विभागातील अधिकारी मूग गिळून गप्प होते. याही प्रकरणात अद्याप घाट चालकांवर दंड ठोठावण्यात आलेला नाही.त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !