प्रख्यात कायदेपंडित,उज्ज्वल निकम,भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला,शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते,शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हणून राज्यसभेवर नियुक्ती.
एस.के.24 तास
दिल्ली : प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती.या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.काँग्रेस च्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता.
लोकसभेला पराभव झाल्यानंतर आता उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवण्यापर्यंत वकील उज्वल निकम यांची मोलाची भूमिका राहिली होती. उज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं. त्यामुळे आता उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रपतींनी त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करून उज्वल निकम यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे.
राष्ट्रपतींनी चार जणांच्या नावाचं नामांकन केलं आहे. कारण या पूर्वी नामनिर्देशित सदस्यांच्या निवृत्तीमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांवर आता हर्षवर्धन श्रृंगला, सी सदानंदन मास्ते, मीनाक्षी जैन आणि उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यसभेवरील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकम काय म्हणाले ?
“आपलं दोन्ही भाषेवर प्रभुत्व आहे. तुम्ही कोणत्याही भाषेत माझ्याशी संवाद साधू शकता, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी मराठीत संभाषण केलं आणि मला सांगितलं की राष्ट्रपती तुमच्यावर एक जबाबदारी सोपवू इच्छित आहेत.
ही जबाबदारी देशाच्या दृष्टीकोनातून तुम्ही चांगली सांभाळाल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो”, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
“भाजपाने मला जेव्हा लोकसभेची उमेदवारी दिली होती, तेव्हा पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने माझ्यावर लोकसभेच्या निवडणुकीत जो विश्वास दाखवला होता तो विश्वास मी यावेळी सार्थ करून दाखवेन. अर्थात राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
कायद्याचा अभ्यास आणि कायद्याचं विश्लेषण आणि या देशाच्या ऐक्यासाठी, देशातील लोकशाही आणि देशाचं संविधान कशा पद्धतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन”, असं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.
“महाराष्ट्राच्या जनतेला मी आश्वासित करतो, कारण महाराष्ट्रातून माझ्या एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मी आभार व्यक्त करतो. मला कल्पना आहे की माझ्यावरील ही जबाबदारी मोठी असली तरी सर्वांचे आशीर्वाद मला मिळतील.
मी अनेक दहशतवाद्यांचे खटले चालवले. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचला असा कुठेही पुरावा नसल्याचं पाकिस्तानने सांगितलं होतं. पण त्यांना उत्तर देताना आम्ही डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली होती.
डेव्हिड हेडलीची साक्ष घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे आम्ही त्यावेळी डेव्हिड हेडलीची साक्ष घेऊ शकलो”, असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.