तीन आरोपींनी अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने एका अल्पवयीन मुलीने वडिलांसह शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
📍त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल.
एस.के.24 तास
चिमुर : तीन आरोपींनी अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला,अशी तक्रार एका अल्पवयीन मुलीने वडिलांसह शेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तिघांना अटक केली.त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
दोन महिन्यापूर्वी म्हणजे भर उन्हाळ्यात २४ मे २०२५ रोजी तीन आरोपींनी अत्याचार केल्याचे अल्पवयिन पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७०(२), १२३, तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ई), ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव हे तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपींची नावे पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवली आहे.
या प्रकरणाशी संबंधित कोणतेही छायाचित्र किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करू नये.असे केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागतर्फे करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील २१४ मुली व महिला बेपत्ता
चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली आणि महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला.
यावेळी मागील अडीच वर्षांची आकडेवारी सभागृहात सादर करताना दररोज सरासरी तीन मुली अथवा महिला बेपत्ता होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील काहींचा शोध लागलेला असला तरी एकूण २१४ महिला आणि मुली अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
याप्रसंगी ते म्हणाले की,सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचा अपरिचित व्यक्तींशी संपर्क येत असून त्याचा गैरवापर केला जात आहे. काही लोक सोशल मीडियावरून महिलांना फसवून, त्यांच्याशी ओळख वाढवून, त्यांना चुकीच्या मार्गाने वेगवेगळ्या राज्यात पाठवून फसवत आहेत.
मागील अडीच वर्षांच्या काळात २ हजार ७३० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत.यामध्ये २ हजार ३०१ महिला आणि ४३९ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यातील अनेकांचा शोध लागला असला तरी अद्यापही २१४ महिला व मुली बेपत्ता असल्याचे वास्तव त्यांनी सभागृहात मांडले.
या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा तसेच बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवावी,अशी मागणी सभागृहात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.