काळविटाची शिकार करून त्याचे मांस शिजवून खात असतांना थेट वनविभागाने जेवणाच्या ताटावरूनच रंगेहात अटक.
📍काळविट मांस वनविभागने केले जप्त.
एस.के.24 तास
अकोला : काळविटाची शिकार करून त्याचे मांस खाण्याचा बेत आखणाऱ्या आरोपींना अकोला प्रादेशिक वनविभागाने जेवणाच्या ताटावरूनच रविवारी रंगेहात ताब्यात घेतले. काळविटाचे मांस वनविभागने जप्त केले आहे.
या प्रकरणी वन विभागाने चार आरोपींवर गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली, तर एक मुख्य आरोपी फरार झाला आहे.अकोट वनपरिक्षेत्रात जऊळखेड येथे ही कारवाई झाली.
अकोट वनपरिक्षेत्रात जऊळखेड येथे वन्यप्राणी काळविटची शिकार करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती अकोला (प्रादेशिक) वनविभागाला मिळाली.
गोपनीय माहितीच्या आधारे भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार जऊळखेड येथे अंकुश गणेश इंदौरे,गणेश दयाराम इंदौरे आणि दिगंबर जनकीराम घारे रा. कुटासा यांच्या घराची झाडझडती घेण्यात आली.काळविटाचे मांस शिजवून खात असतांना आरोपी दिगंबर घारे याला ताब्यात घेण्यात आले.
अंकुश व गणेश इंदौरे यांनाही अटक करण्यात आली. ते मुलगा व वडील आहेत. काळविटाचे अर्धा किलो मांस जप्त केले.मुख्य आरोपी ईश्वर बाळकृष्ण इंदोरे हा फरार असून त्याने अंकुश इंदौरेसह कुटासा जंगलात काळविटाची शिकार केली होती.त्यानंतर दोघांनी मांसाची हिस्से वाटणी केली होती.
ही कारवाई उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सहाय्यक वनसंरक्षक (वने) नम्रता ताले यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) व्ही. आर. थोरात यांच्या नेतृत्वात वन कर्मचारी पी. ए.तुरुक, वनरक्षक अतिक हुसेन,सुभाष काटे, सोपान रेळे, तुषार आवारे आदींच्या पथकाने केली.
वन्य प्राणी सुरक्षित राहण्यासाठी समाजातून पुढाकाराची गरज
वन्य प्राण्याचे नैसर्गिक महत्व आहे. वन्यप्राणी संवर्धनासाठी समाजाने पुढे येण्याची गरज असून त्यांच्यात आपुलकीची भावना निर्माण होईल. वन व वन्यप्राणी जोपासना व संवर्धन होण्यासाठी वन्य प्राणी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांची शिकारी करतांना किंवा त्यांना त्रास देताना कोणी आढळून आल्यास तसेच जंगलास आग लावताना दिसल्यास त्वरित शासनाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क करून माहिती द्यावी. गुन्ह्याबद्दल किंवा अपप्रकाराबद्दल तक्रार करावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. आपल्या एका मदतीने एका वन्यप्राण्यांचा जीव वाचू शकतो, अशी माहिती अकोला वनपरिक्षेत्र वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) व्ही. आर. थोरात यांनी दिली.