दोन दिवसापासून मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे भागात पूरस्थिती निर्माण.
📍भामरागडसह शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला.
एस.के.24 तास
गडचिरोली : दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.भामरागड तालुक्याला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने सकाळ पासून भामरागड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
पुरामुळे आलापल्ली - भामरागड मार्ग बंद असून, जिल्ह्यातील चार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्याने दक्षिणेकडील शाळा,महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मागील चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक ९९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल एटापल्ली तालुक्यात ६८.४ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातील नऊ विभागांमध्ये अतिवृष्टी झाली.
ताडगाव परिसरात १२० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली - भामरागड मार्ग बंद आहे. यामुळे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय सिरोंचा असरअली,ताडगाव-दामरंचा व अहेरी - वट्रा हे मार्गही बंद आहेत.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ३०२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासनाने रेड अलर्ट जारी केल्याने प्रशासनाने चामोर्शी, अहेरी,भामरागड, मुलचेरा, सिरोंचा इत्यादी तालुक्यांतील शाळा,महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
६४ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले : -
जिल्ह्याच्या दक्षिण भागाला पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने आलापल्ली येथील बीएसएनएल टॉवर परिसरातील घरात पाणी शिरल्याने ६४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पुलावरून पाणी वाहत असल्यास ओलांडण्याच्या प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूला सतर्क करण्यात आले आहे.
पुरामुळे बंद असलेले मार्ग : -
हेमलकसा भामरागड रस्ता (पर्लकोटा नदी)राष्ट्रीय महामार्ग-१३० डी तालुका भामरागड, सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-६३ (वडधम गावादरम्यान) तालुका सिरोंचा, ताडगाव दामरंचा रस्ता , इजिमा-२६ तालुका भामरागड (दामरंचा जवळ), अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला) जे मार्ग सकाळी ११ वाजेपर्यंत बंद होते.पावसाचा जोर कमी न झाल्यास आणखी काही मार्ग बंद होऊ शकतात.