मुल येथील सुदर्शन मनोहर शेंडे यांना पीएच.डी.(डॉक्टरेट) पदवी प्राप्त.
एस.के.24 तास
मुल : येथील टीचर कॉलनी मधील विद्यार्थी सुदर्शन मनोहर शेंडे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी येथून कृषिविद्या (Agronomy) विषयात पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी प्राप्त केली आहे.
सुदर्शनचे वडील सेवानुवृत प्राथमिक शिक्षक असून त्याचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्राथ.शाळा, विहीरगाव (मुल) येथे झाले.इयत्ता पाच ते दहावी पर्यंतचे शिक्षण मूल येथील नवभारत विद्यालयात झाले.इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण विद्या निकेतन,चंद्रपूर येथून पूर्ण केले.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय, वर्धा येथून बी. एससी. (कृषी) पदवी प्राप्त केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे कृषिविद्या (Agronomy) विषयात एम. एससी. (कृषी) पूर्ण केली.
पुढे म.फु.कृ.वि.राहुरी येथील गुरुवर्य डॉ.यु. एस.सुर्वे, प्राध्यापक, कृषिविद्या विभाग,म.फु.कृ.वि.राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिविद्या (Agronomy) या विषयात पीएच.डी.(डॉक्टरेट) पूर्ण केली.पीएच.डी (डॉक्टरेट) साठी “ शेडनेटखाली वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत (मृदा प्रकारात) पिकवलेल्या आल्यावर खत आणि पाणी व्यवस्थापनाच्या (फर्टिगेशन) विविध स्तरांचा आणि कालावधीचा होणारा परिणाम ” या पीएचडी प्रबंध विषयामध्ये सुदर्शन ने संशोधन केले.
या दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील‘ प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली नेट (NET-National Eligibility Test) उतीर्ण केली. सध्या तो राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे “ साहाय्यक प्राध्यापक ’' या पदावर कार्यरत आहे. या यशामध्ये आई-वडील,बहिण, मित्रवर्ग यांचे प्रोत्साहन व गुरुवर्य यांचे मार्गदर्शन लाभले त्यामुळे हे यश संपादन करता आले अशी प्रतिक्रिया सुदर्शन यांनी दिली.