निलगायीची शिकार करून पोता रस्त्यावर फेकून अंधाराचा फायदा घेत शेतशिवारत पसार.
📍आष्टी ते आलापल्ली मार्गावरील लगाम परीसरातील घटना.
एस.के.24 तास
अहेरी : नजीकच्या नागेपल्ली येथील वनविकास महामंडळाच्या वसाहतीत चितळाचे मांस शिजवून ताव मारल्याचे प्रकरण उघडकीस आले असतांनाच आष्टी ते आलापल्ली महामार्गावरील लगाम परीसरात निलगायीची शिकार करण्यात आल्याची घटना निदर्शनास आली आहे.यामुळे वनविभागात खळबळ निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार आष्टी ते आलापल्ली ३५३ - सी या राष्ट्रीय महामार्गावर लगाम परिसरात ८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अहेरी पोलीस गस्तीवर असताना शांतिग्राम आणि बोरी दरम्यान दोघेजण दुचाकीवर पोत्यात काहीतरी बांधून घेऊन जाताना आढळले. पोलिसांना संशय येताच त्यांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग केला.
दुचाकीस्वाराला पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच पोती रस्त्यावर फेकून अंधाराचा फायदा घेत एकजण शेतशिवारत पसार झाला तर दुसर्याने दुचाकी घेऊन धूम ठोकली. पोलिसांनी सदर दोन पोती उघडून तपासले असता पोत्यात नीलगायीचे अवयव आढळून आले.
विशेष म्हणजे एका पोत्यात शिंगे असलेले डोके आणि दुसर्या पोत्यात दोन पाय आढळले. लगेच अहेरीचे पोलीस उप निरीक्षक चैतन्य घावटे यांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना दिली.
वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठत मोका पंचनामा केला. निलगायीच्या अवयवांची तपासणी करून पशुधन विकास अधिकारी डॉ.चेतन अलोने यांनी वन विभागाला मृत्य प्रमाणपत्र दिले.
तर अवयव प्रादेशिक न्याय वैद्यक विज्ञान प्रयोग शाळा, नागपूर येथे फॉरेन्सिक रिपोर्ट करीता पाठविण्यात आले. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आलपल्लीचे उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार करीत आहेत.