सहली चा मोह अतिउत्साह जीवावर बेतला ; तरुणाचा तलावात बुडून मृत्यू.
एस.के.24 तास
नागपूर : सध्या विदर्भात पावसाने सर्वत्र जोर धरला आहे. त्यामुळे शहरालगत असलेल्या तलावांवर तरुणांची झुंबड उडत आहे. वातावरण अल्हादयायक झाल्याने सहलीचा मोह अनावर होत असतानाच अतिउत्साह जीवावर बेतत आहे.असाच काहीसा प्रकार शनिवारी घडला.
नको ते धाडस करून बसलेल्या एका तरुणाचा सालई मेंढा तलावात बुडून मृत्यू झाला. शहरापासून अवघ्या काही किलोमिटरवर असलेल्या हिंगणा तालुक्यात ही दुर्घटना घडली.
पियुष सूरज सुखदेवे वय,२० वर्ष असे सालई मेंढा तलावात बुडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. कामठीतल्या भिलगाव येथून पियुष हा अन्य चार मित्र मृणाल दिनेश टके,हर्ष सिद्धार्थ थुलकर,करण लक्ष्मण चौधरी, क्रिश प्रकाश स्वामी यांच्यासोबत सालाई मेंढा तलावावर आला होता.
सकाळी १० च्या सुमारास हे पाच मित्र तलावाच्या काठावर पोहोचले. पाऊस सुरू असतानाही पियुषला तलावात उतरण्याचा मोह अनावर झाला. अचानक तो खोल पाण्यात गेला. तिथे पाण्याचा अंदाज त्याला आला नाही.
पोहता येत नसल्याने पियुष गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस आणि अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. अनेक तासांच्या कठोर परिश्रमानंतर अखेर पियुष सुखदेवेचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. याची माहिती मिळताच मृत पियुषचे मामा अमर तागडे घटनास्थळी पोहोचले.
हिंगणा वरिष्ठ पोलीस निरीक्षक,जितेंद्र बोबडे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला आहे.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.