मुंबई : आई आणि मुलाचं नातं सर्वात पवित्र मानले जाते आई 9 महिने मुलाला आपल्या पोटात वाढवते. मुल लहान असताना त्याची सर्व काळजी घेते.त्याला काय हवं काय नको हे सर्व पाहते. मुलांसाठी आपलं करियर पणाला लावणाऱ्या महिला कमी नाहीत.पण,त्याचवेळी या नात्याला तडा देणाऱ्या धक्कादायक गोष्टी देखील अनेकदा समोर येतात.असाच एक संतापजनक प्रकार त्रिपुरामध्ये घडला आहे.
त्रिपुराच्या सिपाहीजला जिल्ह्यातील सोनामुरा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.येथील एका महिलेने आपल्या 5 महिन्यांच्या मुलीची हत्या केली, कारण तिला आपल्या प्रियकरासोबत पळून जायचं होतं. पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेचं नाव सुचित्रा देबवर्मा असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषद (TTAADC) च्या अंतर्गत येणाऱ्या रामपदापारा गावात सुचित्रा देबवर्माने आपल्या बाळाची हत्या केल्याचा आरोप आहे. तिच्या सासरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस सूत्रांनी पुढे सांगितलं की, जेव्हा महिलेचा पती अमित देबवर्मा घराबाहेर रबरच्या बागेत कामासाठी गेला होता, त्याचवेळी बाळाचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक संशयित महिलेच्या घरी पोहोचले.त्यांना नवजात बाळाचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला.नंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी सोनमुरा येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.
बाळाच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. कारण बाळाची हत्या आईनेच केल्याचा आरोप आहे. पोलिस सूत्रांनी हेही सांगितलं की, पहिल्या दृष्टीक्षेपात असं वाटतं की, सुचित्राने तिचा पती अमित देबवर्मा रबर बागेत कामासाठी गेल्यावर बाळाचा गळा दाबून खून केला. चौकशी तिने कबूल केलं की, बाळाची हत्या करून तिला तिच्या प्रियकरासोबत पळून जायचं होतं, ज्याच्यासोबत तिचं विवाहबाह्य संबंध होतं.