रक्षाबंधनासाठी तो पत्नीला घेऊन निघाला आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
" तो " विनवण्या करत राहिला,पण एकही जण थांबला नाही ; अखेर त्याने पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधला अन्…
एस.के.24 तास
नागपूर : रक्षाबंधनासाठी तो पत्नीला भावाच्या घरी घेऊन निघाला.घरापासून गाव अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असल्याने दोघेही दुचाकीनेच निघाले.पण काळाने कदाचित वेगळेच काही तरी ठरवले होते. वाटेत दबा धरून बसलेल्या नियतीने अखेर डाव साधला. ट्रकने दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आणि तितक्यातच धो - धो पाऊस सुरू झाला.
भर पावसात रक्ताच्या थारोळ्यात पत्नी महामार्गावरच निपचित पडल्याचे पाहून तिला रुग्णालयात नेण्यासाठी तो येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात जोडून, गयावया करत थांबण्यासाठी विनवण्या करत राहिला. पण एकाच्याही काळजाला पाझर फुटला नाही.अखेर त्याने पत्नीचा मृतदेह चक्क दुचाकीला बांधला आणि सुसाट वेगाने कोराडीच्या दिशेने निघाला.
मानवी संवेदना सुन्न करणारा आणि अंगावर काटा आणणारा हा प्रसंग घडला नागपूरपासून अवघ्या ५० किलोमिटर अंतरावरील महामार्गावरच्या सावनेर जवळ. रविवारी दुपारी २.३० ते ३ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अमित यादव असे लोकांनी मदत न केल्याने पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधण्याची वेळ ओढवलेल्या तरुणाचे नाव आहे.
अमितची पत्नी ग्यारसी यादव ही मूळची मध्य प्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यातील करणपूर येथील रहिवासी. दहा वर्षांपूर्वी तिचा अमित भुरा यादव (३५) सोबत विवाह झाला. तेव्हापासून हे दाम्पत्य सावनेरजवळच्या लोणारा येथे राहतात. रक्षाबंधनाचा सण असल्याने त्याची पत्नी ग्यारसी हिने भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी घेऊन जाण्याची विनंती पती अमितकडे केली. दोघेही एमएच-४०/डीबी-१९८३ क्रमांकाच्या दुचाकीने पत्नीचे माहेर असलेल्या लोणाराकडे निघाले.देवलापारमार्गे करणपूरला मधल्या मार्गाने जाता येत असल्याने दोघे त्या रस्त्याने निघाले.
देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळ दबा धरून बसला आहे.याची पुसटशीही कल्पना त्याला आली नसेल.अखेर नियतीने डाव साधला. मोरफाटा परिसरात मागून वेगात आलेल्या ट्रकने (आयशर) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. बेसावध क्षणी ट्रकच्या चाकाखाली आल्याने ग्यारसी हिचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी धो- धो पाऊस सुरू झाला.
पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून अमितने नागरिकांना हात जोडून गाडी थांबविण्याची विनंती केली. रस्त्यावरून धावत असलेल्या शेकडो वाहनांपैकी एकाच्याही काळजाला पाझर फुटला नाही. पाऊस सुरू असताना एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसत असूनही एकही जण गाडी थांबवायला तयार नव्हता.
अखेर हतबल अमित यादवने अश्रू पुसत पत्नी ग्यारसीचा मृतदेह दुपट्ट्याने दुचाकीला बांधला.त्याच अवस्थेत तो सुसाट कोराडीच्या दिशेने निघाला.या प्रकाराची माहिती कोणीतरी कोराडी पोलिसांना दिली. महामार्ग पोलिसांनी त्याचा पाठलाग करत थांबवण्याचा प्रयत्न केला.पोलीस पाठलाग करत आहे,या भीतीने तो आणखी वेगात वाहन चालवत राहिला.
पोलिसांनी अखेर त्याला अडवले.ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तो नागपुरातील मेयो रुग्णालयात पाठवला.ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सकाळी या घटनेचा तपास देवलापार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.