डेंग्यूचा प्रकोप आठ दिवसांत ४ मृत्यू ९४ बाधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई.
📍१ डॉक्टर सेवेतून कार्यमुक्त.१ डॉक्टर चौकशीखाली,२ आरोग्य सहाय्यक निलंबित ; सहपालकमंत्री अहवाल मागवणार दोषींची गय नाही.
एस.के.24 तास
मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील लगाम व येल्ला गावांमध्ये डेंग्यूचा प्रकोप वाढत असून, केवळ आठ दिवसांत चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या भागात तब्बल ९४ रुग्णांचे रक्त तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
या गंभीर परिस्थितीवर लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले असून, निष्काळजीपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तातडीची कारवाई करण्यात आली आहे.
प्रकरण उघडकीस कसे आले ?
६ ऑगस्ट रोजी लगाम गावात पहिला डेंग्यू रुग्ण आढळला. परंतु, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व लगाम प्राथमिक आरोग्य केंद्राने ही माहिती जिल्हा मुख्यालयाला वेळेत कळविली नाही.
निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई -
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी १४ ऑगस्ट रोजी लगामचे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ.ओंकार कोल्हे यांना सेवेतून कार्यमुक्त केले.तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.गेडाम यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. याशिवाय मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक अशोक डोंगरवार आणि लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिंगाजी नैताम या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
त्यांच्यावर गावात साथीचा रोग पसरत असताना निष्काळजीपणा केला,तातडीने उपाययोजना केल्या नाहीत असा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन चौकशी अहवाल सादर केला होता.त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
सहपालकमंत्री सविस्तर अहवाल मागविणार : -
या प्रकरणाचा उल्लेख आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला.त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली.बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल म्हणाले, या प्रकरणात सविस्तर अहवाल मागविणार असून, कोणाचीही गय केली जाणार नाही.