सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या कार्याची दखल,स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन जिल्हा स्मार्ट ग्राम कळमनाचा गौरव.
राजेंद्र वाढई - उपसंपादक एस.के.24 तास
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना हे गाव स्वच्छ, सुंदर निर्मळ आणि पर्यावरण पुरक आणि जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त गाव असून येथे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. सामाजिक,आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण व सुरक्षा अशा अनेक बाबतीत नैत्रदिपक विकासकामे पूर्ण केली आहेत. त्यामुळेच आज एक वेगळी ओळख गावाला प्राप्त झालेली आहे.
स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या अथक परिश्रमाने कळमना हे गाव जिल्हा स्तरावर आर. आर. पाटील जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून प्रथम क्रमांक मिळालेला आहे. याच अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. अशोकराव उईके यांच्या हस्ते आर. आर. पाटील जिल्हा स्मार्ट ग्राम कळमना यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी हा सन्मान स्विकारला.
यावेळी त्यांच्या सोबत गावचे ग्रामसेवक शुभांगी कावलकर, महादेव ताजने अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ कळमना, सुरेश गौरकार गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार प्रतीभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मीना साळुंखे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, घायगुडे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नुतन सावंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिलेल्या सन्मानाने आपल्या या सेवाव्रताच्या साधनेत सहकार्य करणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीचा सहभाग लाभलेला असून माझ्या कामाची दखल घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सन्मान केल्याबद्दल आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी कुतज्ञता व्यक्त करीत मिळालेला सन्मान कळमना येथील सर्वसामान्य मायबाप जनतेला समर्पित करतो अशी भावना व्यक्त केली.