गडचिरोलीतून शासनाकडे मागणी,पारंपरिक गटई ठेल्यांऐवजी आधुनिक व्यवसाय साधनांची तरतूद व्हावी.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली येथे समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे अनुसूचित जातीतील समाजबांधवांसाठी अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या पारंपरिक गटई ठेल्यांच्या योजनेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मार्फत समाजकल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन यांना निवेदन सादर केले. यामध्ये पारंपरिक व्यवसायांवर उदरनिर्वाह करणे आजच्या युगात शक्य नसल्याचे नमूद करत, समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणी बेरोजगार राहत असून ते नैराश्य व व्यसनाधीनतेकडे वळत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
संघटनेच्या निवेदनात, पारंपरिक गटई ठेल्यांऐवजी तरुणांना स्वावलंबी होण्यासाठी ऑटो-रिक्षा, पिकअप, मेटॅडोर, कार यांसारख्या आधुनिक व्यवसाय साधनांसाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच, उद्यमशीलता वाढीसाठी मार्गदर्शन शिबिरे व कौशल्य विकास कार्यशाळा घेण्याचीही सूचना मांडण्यात आली.
या प्रसंगी समाजातील तरुणांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुधारित योजना तातडीने लागू कराव्यात, अशी एकमुखी मागणी समाजबांधवांनी केली.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मान.लक्ष्मण मोहुर्ले, प्रदेश महिला अध्यक्ष,मायाताई मोहुर्ले, प्रदेश उपाध्यक्ष विजय देवतळे,सचिव किशोर नरूले, सहसचिव संदीप येनगंटीवार,जिल्हा अध्यक्ष,सुनील मोहुर्ले,शहर अध्यक्ष, किशोर देवतळे, जिल्हा सचिव योगेश गोरडवार, संतोष कोपुलवार,देवेंद्र लाटकर,राष्ट्रपाल आत्राम तसेच संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.