चकमकीत 2 नक्षलवादी केंद्रीय समिती सदस्य ठार ; दोघांवर विविध राज्यात एकूण दहा कोटींचे बक्षीस होते.


चकमकीत 2 नक्षलवादी केंद्रीय समिती सदस्य ठार ; दोघांवर विविध राज्यात एकूण दहा कोटींचे बक्षीस होते.


एस.के.24 तास


गडचिरोली : महाराष्ट्र सीमेपासून दहा किमी अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुजमाडच्या जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या दोन केंद्रीय समिती सदस्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. 


कादरी सत्यनारायण उर्फ कोसा वय,67 वर्ष,कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ विकल्प उर्फ राजू दादा वय,61 वर्ष असे ठार झालेल्या नक्षल नेत्यांचे नाव असून दोघांवर विविध राज्यात एकूण दहा कोटींचे बक्षीस होते.महिनाभरात चार केंद्रीय समिती सदस्य ठार झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नारायणपूर-गडचिरोली लगतच्या अबुजमाडच्या सीमावर्ती परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबवली होती.दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी काही तास चकमक चालली. 

अखेरीस सुरक्षा दलांना निर्णायक यश मिळाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसा हा नक्षल चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा नेता होता. केंद्रीय समितीत त्याचा मोठा प्रभाव होता. तर विकल्प हा देखील महत्वाचा नेता होता. नक्षल चळवळीत प्रवक्तेपदासह महत्वाची जबाबदारी त्याच्याकडे होती.

कारवाईनंतर घटनास्थळावरून दोघांच्या मृतदेहासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, स्फोटके, साहित्य आणि नक्षलवादी प्रचारसाहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये एके-४७ सारखी अत्याधुनिक बंदूकचा समावेश आहे.

पोलिसांच्या मते, जप्त केलेला साठा आगामी हिंसक कारवायांसाठी वापरला जाणार होता. मागील काही दिवसांपासून कोसा आणि विकल्प हे साथीदारांसह या परिसरात लपून बसले होते. दहा दिवसांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत ते थोडक्यात बचावले होते.

सप्टेंबर महिन्यात सुरक्षा दलाला नक्षलवाद्यांच्या चार केंद्रीय समिती सदस्यांना ठार करण्यात यश आले आहे. सोमवारी ठार झालेले कादरी सत्यनारायण उर्फ कोसा (६७) हा तेलंगणातील थाडूर सिरसिला जिल्ह्यातील रहिवासी असून त्याची पत्नी राधक्का ही देखील नक्षल कमांडर होती. कोसा हा काम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (माओवादी) महासचिव पदाचा प्रमुख दावेदार होता. 

तर तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील रहिवासी वकिलीचे शिक्षण घेतलेला कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ विकल्प उर्फ राजू दादा वय,61 वर्ष  हा नक्षल चळवळीत महत्वाचा नेता होता.विकल्प नावाने तो नक्षल चळवळीशी संबंधित प्रसिद्धी पत्रक काढायचा. त्याची पत्नी मालती उर्फ शांतीप्रियाला छत्तीसगडमधील रायपूर येथे अटक करण्यात आली होती.

याच महिन्यात छत्तीसगडमधील गरियाबंद येथे झालेल्या चकमकीत केंद्रीय समिती सदस्य मनोज ठार झाला होता. केंद्रीय समिती सदस्य तथा सर्वोच्च महिला नक्षल नेता सुजाता हिने तेलंगणात आत्मसमर्पण केले. त्यानंतर केंद्रीय समिती सदस्य सहादेव सोरेन झारखंडमध्ये ठार झाला. 


सोमवारी आणखी दोन केंद्रीय समिती सदस्य ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. वर्षभरात सुरक्षा दलांनी मोठ्या नेत्यांसह २५० नक्षलवाद्यांना ठार केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !