महिला उपनिरीक्षक आणि तक्रारदार यांच्यात शाब्दिक चकमक ; महिला उपनिरीक्षकाने वर्दी वरील नावाचा बॅज तक्रारदाराला फेकून मारला.
एस.के.24 तास
मुंबई - दक्षिण मुंबईतील एका पोलिस ठाण्यात महिला उपनिरीक्षक आणि तक्रारदार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.दोघांमधील वादाने पोलिस ठाणे डोक्यावर घेतले. रागाच्या भरात महिला उपनिरीक्षकाने वर्दीवरील नावाचा बॅज तक्रारदाराला फेकून मारला.
ही घटना १८ सप्टेंबर रोजी गिरगाव येथील व्ही.पी.रोड पोलिस ठाण्यात घडली असून,त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची दखल घेत,गिरगाव विभागाचे सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) यांना चौकशीचे आदेश दिल्याचे पोलिस उपायुक्त मोहित कुमार गर्ग यांनी सांगितले.
एका महिलेसह काही नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते.त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला उपनिरीक्षक यांच्यासोबत त्यांची वादावादी झाली. या वादात महिला अधिकाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नावाची प्लेट काढून उपस्थितांवर फेकल्याचे व्हिडीओत दिसून येते.
घटनास्थळी उपस्थित असलेल्यांपैकी एकाने हा प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. पुढे हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याने तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.