ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जीप्सी चालक शेतात फवारणीसाठी लागणारा मोटर पंप घेऊन वडिलांकडे जात असतांना वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार.
एस.के.24 तास
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील भामडेली गावात आज २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.मृतकाचे नाव अमोल बबन नन्नावरे (३७), रा. भामडेली असे असून ते ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जीप्सी चालक म्हणून कार्यरत होते. सकाळी अमोल नन्नावरे हे आपल्या शेतात फवारणीसाठी लागणारा मोटर पंप घेऊन वडिलांकडे गेले होते.
त्याचवेळी शिकार शोधत फिरणाऱ्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला. वाघाने त्यांना सुमारे ५० फूट ओढत नेले. हा भीषण प्रकार त्यांच्या वडिलांसमोरच घडला.त्यांनी आरडाओरड केल्यावर वाघाने अमोल यांचा मृतदेह सोडून जंगलाचा रुख केला. मृतदेहावर मानेला खोल जखमा आढळल्या असून शवविच्छेदनासाठी भद्रावती येथे पाठविण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थीपे, क्षेत्र सहाय्यक एस. जुमडे, बालपणे, वनरक्षक, PRT पथक, वनमजूर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
मृतक अमोल नन्नावरे यांच्या पश्चात पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाने संबंधित वाघाला पकडून बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
या दुःखद घटनेची माहिती मिळताच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मदतकार्याला सुरुवात केली. त्यांच्या सूचनेनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे आणि पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निर्देशानुसार, मृत अमोल नन्नावरे यांच्या पत्नी प्रेमिला अमोल नन्नावरे यांना घटनास्थळीच तात्काळ रोख ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली.
तसेच, नन्नावरे कुटुंबियांना नियमानुसार पुढील शासकीय मदत लवकरात लवकर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावी, यासाठी प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आदेशही त्यांनी दिले.यासोबतच, परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आणि ग्रामस्थांमध्ये शेतात काम करताना सतर्क राहण्याबाबत जन-जागृती करण्याचे निर्देशही त्यांनी वनविभागाला दिले आहेत.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नन्नावरे कुटुंबियांना या कठीण परिस्थितीत प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,अशी ग्वाही दिली.