तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्यास निघालेल्या तरुणाचे प्राण वाचविले.
📍गडचिरोली येथील वर्दीतले दोन वाहतूक पोलीस ठरले देवदूत.
एस.के.24 तास
गडचिरोली : शहरातील चंद्रपूर मार्गावरील मुख्य तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्यास निघालेल्या तरुणाचे प्राण शुक्रवारी (दि,19) दुपारी दोन वाहतूक पोलीस कर्मचार्यांनी वाचवले. त्यांच्या वेळेवर दाखविलेल्या तत्परतेमुळे एक हकनाक बळी जाण्यापासून वाचला असून शहरात वाहतूक पोलीसांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम बळीराम झुरी वय,26, रा.खेडी(रांगी) ता.धानोरा सध्या रा. गडचिरोली हा युवक आत्महत्या करण्याच्या तयारीत होता.त्याचा मोठा भाऊ मयूर झुरी याने याची माहिती तत्काळ कारगिल चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस अजय शेंडे व पंकज सहारे यांना दिली.
यावेळी या दोन्ही कर्मचार्यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावाकडे धाव घेत आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या शुभमला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.युवकाचे प्राण वाचवून मानवतेचे कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या कार्याचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.