अवैध रेती उत्खननावर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे आणि तलाठी कु.अश्विनी सडमेक यांना केले निलंबित. 📍तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियंत्रण न ठेवल्याबद्दल कारवाई करून बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे.

अवैध रेती उत्खननावर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे आणि तलाठी कु.अश्विनी सडमेक यांना केले निलंबित.


📍तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियंत्रण न ठेवल्याबद्दल कारवाई करून बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे.


एस.के.24 तास


गडचिरोली : दि. 16 ऑक्टोबर 2025 : सिरोंचा तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुकीच्या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे आणि तलाठी कु.अश्विनी सडमेक यांना निलंबित केले असून तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियंत्रण न ठेवल्याबद्दल कारवाई करून बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली आहे.


सिरोंचा तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याच्या आणि महसूल विभागाकडून त्यावर नियंत्रण ठेवण्यात निष्काळजीपणा झाल्याच्या तक्रारी माध्यमांतून वारंवार प्राप्त होत होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी,अहेरी यांना चौकशीचे आदेश दिले.


२ ऑक्टोबर रोजी मौजा मद्दीकुंठा व चिंतरेवला या रेतीघाटांवर करण्यात आलेल्या मौका चौकशीत तब्बल १५,६६५ ब्रास अवैध रेती साठा आढळून आला व त्यासाठी २९ कोटीपेक्षा अधिक रकमेचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. 


तसेच दोन जेसीबी, एक पोकलँड मशिन आणि पाच ट्रक रेती उत्खनन व वाहतुकीसाठी वापरले जात असल्याचेही निष्पन्न झाले.या चौकशीत महसूल कर्मचाऱ्यांची निष्क्रियता स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार निलेश होनमोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्यावर कारवाई करून बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे केली आहे.


महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील वाळूगटाची नियमित पाहणी करून अवैध उत्खननाबाबत वरिष्ठांना अहवाल देणे अपेक्षित असते. मात्र, कु. अश्विनी सडमेक यांनी ही जबाबदारी पार पाडण्यात दुर्लक्ष केल्याचे चौकशीत दिसून आले. 


तसेच मंडळ अधिकारी राजू गणपतराव खोब्रागडे यांनी देखील रेतीघाटाची पाहणी व दैनंदिन नोंद ठेवण्यात कसूर केल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी तात्काळ प्रभावाने निलंबित केले.


अवैध रेती उत्खनन प्रकरणी जिल्ह्यातील महसूल यंत्रणेने सजग राहण्याचे व कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !