स्मार्ट मीटरचा वीज पुरवठा खंडित झाल्यावर आता ग्राहकांना पुनर्जोडणीसाठी डोकेदुखी 📍एकच महिन्याचे देयक थकल्यास बत्ती गुल ; पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित.

स्मार्ट मीटरचा वीज पुरवठा खंडित झाल्यावर आता ग्राहकांना पुनर्जोडणीसाठी डोकेदुखी 


📍एकच महिन्याचे देयक थकल्यास बत्ती गुल ; पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित


एस.के.24 तास 


नागपूर : महावितरणने राज्यात मोठ्या प्रमाणावर बसवलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे (टाइम ऑफ डे मीटर) ग्राहकांना नव्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी एकाच महिन्याचे वीज देयक थकताच वीजपुरवठा तात्काळ खंडित होत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.देयक भरल्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत व्हायला (पुनर्जोडणी) दोन दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या आहे. महावितरणने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.


महावितरणने राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा वेग वाढवला आहे. सध्या सुमारे ८८ लाख ५० हजार ग्राहकांकडे हे मीटर लावण्यात आले. मीटर लावल्यावर देयक थकल्यास वीजपुरवठा रिमोट पद्धतीने तात्काळ खंडित करता येतो. २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान राज्यातील २ लाख ४५ हजार ५४७ ग्राहकांचा वीजपुरवठा देयक न भरल्यामुळे एकाच वेळी खंडित करण्यात आला होता.


यापैकी अनेक ग्राहकांचे केवळ एकाच महिन्याचे वीज देयक थकीत होते, असा आरोप ग्राहक संघटनेचा आहे. देयक भरण्याबाबत भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या,असा दावा महावितरणकडून करण्यात आला असला, तरी अनेकांना अशी कोणतीही सूचना मिळाली नसल्याचा आरोप केला आहे.हे देयक भरल्यावर दोन दिवस पुरवठा सुरळीत झाला नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.


पूर्वसूचना न देता थेट वीजपुरवठा खंडित करण्याचा अधिकार कंपनीला आहे का, असा सवाल ग्राहकांनी केला. नागपूरसह राज्यातील विविध महावितरण कार्यालयांत ग्राहकांनी जाऊन याबाबत नाराजी व्यक्त केली. ग्राहक संघटनांच्या मते, पूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना नोटीस देऊन काही प्रमाणात मुदत दिली जात असे. मात्र स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे एकच महिन्याचे बिल थकल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तसेच देयक भरल्यानंतरही वीजपुरवठा लगेच सुरू होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


स्मार्ट प्रीपेड मीटरच्या ग्राहकांनी थकीत देयक भरल्यावरही दोन ते तीन दिवस पुरवठा सुरळीत झाला नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे ग्राहक महावितरण कार्यालयात येऊन वीज कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त करतात. प्रत्यक्षात हा मीटरचा दोष असून त्यात कर्मचाऱ्यांचा दोष नाही. या मीटरला आमचाही विरोध आहे. - मोहन शर्मा, राज्य अध्यक्ष,महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.


स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांची गळचेपी होईल, असे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. त्यामुळे या मीटरला आमचा ठाम विरोध आहे. ग्राहकांनी थकीत देयक भरल्यानंतरही एक-दोन दिवस वीजपुरवठा सुरू न करणे गंभीर बाब आहे. हा मुद्दा उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत मांडला जाईल. - प्रशांत दर्यापूरकर,विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना.


स्मार्ट मीटरमध्ये मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे पारदर्शकता वाढली आहे. देयकाची मुदत संपल्यानंतर ग्राहकांना भ्रमणध्वनीवर तत्काळ सूचना पाठवली जाते. ग्राहकाने वीज देयक भरताच साधारणतः १५ ते २० मिनिटांत स्वयंचलित पद्धतीने वीजपुरवठा सुरू होतो. काही ग्राहकांना वेगळ्या कारणांमुळे पुरवठा सुरळीत झाला नसल्यास समस्या सोडवली जाईल. - भारत पवार,मुख्य जनसंपर्क अधिकारी,महावितरण,मुंबई



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !