पिकअप गाडीत गुप्त कप्पा सागवान लाकडांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघड ; कारवाई लपवली संशयाचे वातावरण वनविभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण.
एस.के.24 तास
सिरोंचा : " पुष्पा " या सिनेमात ज्या प्रकारे चंदनाची तस्करी केली जाते, त्याच धक्कादायक पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यातून मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे.
कधी दुधाच्या टँकर मधून तर कधी नदी-नाल्यांच्या पात्रातून वन विभाग आणि पोलीस विभागाच्या डोळ्यात धूळफेक करत ही तस्करी सर्रासपणे सुरू आहे. गडचिरोलीच्या जंगलातून सागवान तेलंगणा राज्यात पाठवले जात असल्याचा प्रकार समोर आल्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तीन राज्यांच्या सीमेवर तस्करांची वक्रदृष्टी : -
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग त्याच्या मौल्यवान सागवान जंगलासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमा या वन विभागाला लागून असल्यामुळे, परराज्यातील तस्करांची विशेषतः
तेलंगणा आणि छत्तीसगडच्या तस्करांची, या मौल्यवान संपदेवर वक्रदृष्टी पडली आहे. परिणामी, येथे मागील अनेक वर्षांपासून सागवान तस्करीचा गोरखधंदा अव्याहतपणे सुरू आहे. चोरून आणि लपून - छपून मौल्यवान सागवान लाकडाची वाहतूक केली जात आहे.
पिकअप गाडीत गुप्त कप्पा : -
१ ऑक्टोबर रोजी सिरोंचा तालुका मुख्यालयजवळील चिंतलपल्ली येथे वन विभागाने रात्रीच्या वेळी एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड जप्त केले.या कारवाईतील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे, तस्करांनी मालवाहू पिकअप गाडीला खालून पत्रा ठोकून त्यामध्ये एक गुप्त कप्पा तयार केला होता. या कप्प्यात मौल्यवान सागवान लाकडे लपवून त्यांची वाहतूक केली जात होती. वन विभागाच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत हे लाकूड जप्त करण्यात आले आहे.
कारवाई लपवली संशयाचे वातावरण : -
या कारवाईला चार दिवस उलटूनही सिरोंचा वनविभागाने याबाबतची कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना दिली नाही. त्यामुळे ती चारचाकी गाडी कोणाची होती,मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी कुठे केली जात होती.
आणि चौकशीत काय निष्पन्न झाले,याबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. वन विभागाची कारवाई सुरू असली तरी, ही माहिती लपवल्यामुळे सिरोंचा तालुक्यात सागवान लाकडांची तस्करी अजूनही सुरूच असल्याचे आणि तस्करांना पाठीशी घातले जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.