दसऱ्याच्या दिवशी मोठी दुर्घटना ट्रॅक्टर धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या ४ मुलांचा बुडून मृत्यू ; मृतांमध्ये ३ मुलं एकाच कुटुंबातील.
एस.के.24 तास
छत्रपती संभाजीनगर : या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.दसरा सणाला गालबोट लागल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. याठिकाणी ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ही घटना घडली. चार मुलं खदाणीमध्ये टॅक्टर धुण्यासाठी गेली होते. टॅक्टर धुवत असताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमधील ३ मुलं एकाच कुटुंबातील होती. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर धुण्यासाठी खदानीत गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथे दसऱ्याच्या दिवशी ही घटना घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. इरफान इसाक शेख (१७ वर्षे), इम्रान इसाक शेख (१३ वर्षे), ड्रौन हयात पठाण ( ९ वर्षे) आणि व्यंकटेश उर्फ गौरव दत्तू तारक (९ वर्षे) अशी मृत मुलांची नावं आहेत. ही सर्व मुलं लिंबे जळगाव या ठिकाणी राहत होते.
मृत मुलांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि एक आतेभाऊ असे एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी इरफान इसाक शेख हा ट्रॅक्टर धुण्यासाठी जाताना त्यांच्यासोबत त्याचा लहान भाऊ इमरान,मामाचा मुलगा ड्रौन आणि शेजारी राहणारे दत्तू तारक यांचा मुलगा व्यंकटेश उर्फ गौरव हे असे तिघेही ट्रॅक्टरमध्ये बसून गाव शिवारातील मुरूम उत्खनामुळे तयार झालेल्या खदानीत गेले. ट्रॅक्टर धुवत असताना त्यांच्यासोबत भयंकर घडलं आणि खदानीत बुडून त्यांचा मृत्यू झाला.
दीड ते दोन तास झाले तरी मुले परत आली नाहीत. म्हणून मुलांना पाहण्यासाठी ट्रॅक्टर उभे असल्या ठिकाणी कुटुंबातील सदस्य गेले. मात्र तिथे त्यांना कोणीच दिसून आले नाही.त्यांनी त्यांचा शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत.
यावेळी या सर्वांनी शोध घेतला असता एका पाठोपाठ त्यांना तिघांचे मृतदेह हाती लागले तर मोठा इरफान हा तासभर शोध घेतल्यानंतर मिळून आला. तोपर्यंत अनेक जण घटनास्थळी दाखल झाले होते. चारही जणांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.