भरवस्तीत वेश्या व्यवसाय पोलिसांचा छापा ; तीन महिलांना अटक.
एस.के.24 तास
भंडारा : शहरातल्या भरवस्तीत एक ४२ वर्षीय महिला मागील अनेक वर्षांपासून अवैध देहविक्री व्यवसाय चालवत आहे.आजवर किमान चार वेळा पोलिसांनी धाड टाकून या देहविक्री व्यापारावर कारवाई देखील केली आहे.दोन दिवसांपूर्वी सुद्धा पोलिसांनी या देहविक्री अड्ड्यावर धाड टाकून महिलेला ताब्यात घेतले आहे.
वारंवार कारवाई होऊन देखील हा देहव्यवसाय सुरूच आहे.थातूरमातूर कारवाईची पोलिसांनी आता यावर कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करू लागले आहे.जिल्हा परिषद चौकातील रमाबाई आंबेडकर वार्डात एका घरी देहव्यापार चालविला जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला सूत्रांकडून प्राप्त झाली होती. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा,भंडारा पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्त कारवाई करून या देहविक्री अड्ड्यावर छापा टाकला.
या कारवाई दरम्यान,संगीता धारगावे वय,४५ वर्ष ही मुख्य आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना बोलावून व बाहेरील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेत असल्याचे उघड झाले.तिच्या सोबत अन्य दोन आरोपीही यात सामील असल्याचे आढळून आले आहे.
पोलिस अधीक्षक नूरुल हसन,अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पोलीस हवालदार कुथे आणि घरडे यांनी यशस्वीरित्या ही कारवाई केली असून या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, यापूर्वीही या महिलेवर चार वेळा कारवाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ती देहविक्री व्यवसाय करते त्या घराच्या जप्तीसाठी तीन महिन्यांपूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अहवाल दिला आहे.
जप्तीच्या कारवाई संबंधी अहवाल त्यांच्याकडे प्रलंबित असल्यामुळे कायमस्वरूपी कारवाई करण्यास अडचणी येत आहे. नवीन कायद्यानुसार या महिलेवर एमपीडीएची कारवाई करण्याचा देखील विचार सुरू आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,आतापर्यंत दोन वेळा महिलेची सुनावणी घेण्यात आली असून काहीच दिवसात तिच्याकडून लेखी स्टेटमेंट घेतले जाणार आहे त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.