गडचिरोली चे जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांची अखेर तडकाफडकी बदली करून त्यांना मुबंईतील अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुख्यालयात पाठविण्यात आले.
📍त्यांच्या जागी नाशिक जिल्हा सांख्यिकी विभागाचे उपसंचालक प्रसाद घाडगे यांना पदस्थापना.
एस.के.24 तास
गडचिरोली : रुजू झाल्यापासूनच वादग्रस्त ठरलेले गडचिरोलीचे जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी नाशिक जिल्हा सांख्यिकी विभागाचे उपसंचालक प्रसाद घाडगे यांना पदस्थापना देण्यात आली आहे. पाचखेडेच्या भोंगळ कारभाराविषयी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी वरिष्ठ स्तरावर तक्रार केली होती. त्यानंतर पाचखेडेची उचलबांगडी करण्यात आली, हे विशेष.
जिल्हा नियोजन विभागाच्या कारभारावर मागील काही काळापासून प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना देखील नियोजनातील भोंगळ कारभारामुळे लोकप्रतिनिधीसह वरिष्ठ अधिकारी त्रस्त होते. त्यामुळे जिल्हा नियोजन अधिकारी पाचखडे यांच्या विषयी वरिष्ठ स्तरावर अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.काही दिवसांपूर्वी अम्ब्रीशराव आत्राम यांनी केलेल्या दोन पानी लेखी तक्रारीत जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडेंच्या कारनाम्यांचा पाढा वाचला होता.
पाचखेडे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली. अश्लील शिवीगाळ, लोकांशी उध्दट वर्तन,वाहनचालक कर्मचाऱ्यास पूर्वसूचना न देता कामावरुन काढून टाकणे, कामात दिरंगाई यामुळे त्यांच्याविरुध्द अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्रलंबित होत्या. अखेर आमदार नरोटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पाचखेडेच्या कारभाराविषयी अवगत करून दिले.त्यानंतर तात्काळ पाचखेडेची हकालपट्टी करण्यात आली.त्यांना मुबंईतील अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुख्यालयात पाठविण्यात आले आहे.
गंभीर आरोपामुळे चर्चेत जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी पत्नीच्या बँक खात्यात पैसे स्वीकारल्याची तक्रार काही कंत्राटदारांनी केली होती.जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडे पुरावे मागितले होते.२४ मार्च रोजी कंत्राटदारांनी बँक व्यवहाराचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवला होता.
कंत्राटदारांनी पुरावे सादर केल्याने जिल्हा नियोजन अधिकारी पाचखेडे यांच्या अडचणीत भर पडली होती.त्यानंतर गडचिरोली जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा गोंधळ अधिकच वाढला होता.पाचखेडे पूर्वी या पदावर असलेले खडतकर यांची सुद्धा त्यांच्या वादग्रस्त कार्यप्रणालीवरून हकालपट्टी करण्यात आली होती.

