गडचिरोलीतील तीनही पालिकांत नगराध्यक्षपदासाठी २३ उमेदवार मैदानात ; बंडखोरी टळली नाराजांचे आव्हान कायम.

गडचिरोलीतील तीनही पालिकांत नगराध्यक्षपदासाठी २३ उमेदवार मैदानात ; बंडखोरी टळली नाराजांचे आव्हान कायम.


एस.के.24 तास


गडचिरोली : नगराध्यक्ष पदावरून सर्वच प्रमुख पक्षात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली,त्यामुळे सर्वांसमोर बंडखोरीचे आव्हान होते.अनेकांनी माघार घेतल्याने बंडखोरीचा धोका टळला असला तरी पक्षांतर्गत नाराजांचे आव्हान कायम असल्याने राजकीय नेत्यांचा कस लागणार आहे.


जिल्ह्यातील देसाईगंज,आरमोरी आणि गडचिरोली या तिन्ही नगर परिषदांच्या निवडणुकांत नगराध्यक्ष पदासाठीची लढत तापली असून नामांकन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तिघांनी माघार घेतल्यानंतर आता एकूण २३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. शुक्रवार,२१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत होती. त्या


पूर्वीच गडचिरोली व देसाईगंजमध्ये तिघांनी अर्ज मागे घेतले, तर आरमोरीत मात्र कुणीही मागे हटले नाही. गडचिरोलीत नगराध्यक्षपदासाठी ८ अर्ज वैध ठरले होते. मात्र माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले नामांकन मागे घेतल्याने आता अंतिम ७ उमेदवारांचे रिंगण तयार झाले. आरमोरीत नगराध्यक्षपदासाठी एकही उमेदवार मागे हटला नाही.सर्व १० उमेदवार आता सरळ लढतीत आहेत. तर देसाईगंजमध्ये ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. पण माजी नगराध्यक्षा शालू दंडवते व प्रविणा विधाते यांनी माघार घेतल्याने आता केवळ ६ उमेदवार उरले आहेत.


त्यापैकी गडचिरोलीत भाजपच्या प्रणोती निंबोरेकर, काँग्रेसच्या कविता पोरेड्डीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अश्विनी नैताम यांच्या तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आरमोरीत भाजपचे रुपेश पुणेकर, काँग्रेचे प्रशांत सोमकुवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात लढत आहे. तर देसाईगंजमध्ये भाजपच्या लता सुंदरकर, काँग्रेसच्या वनिता नाकतोडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नीता गुरु यांच्या लढत होऊ शकते. 


तिन्ही नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी एकूण ३६० पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दिग्गज उमेदवारांची एन्ट्री,अपक्ष उमेदवारांची आक्रमक भूमिका आणि प्रमुख पक्षांतील थेट टक्कर यामुळे निवडणूक पूर्वीच रंगात आली आहे.प्रचार मोहीम वेग पकडत असून घराघरात संपर्क,मेळावे आणि सोशल मीडियावर उमेदवारांच्या पोस्टर्सची लगबग दिसू लागली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !