गडचिरोली जिल्ह्यातील एका वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून परिचारिकेचा शरीरसुखाच्या मागणीसाठी छळ ?
📍2 वर्षांपासून छळ झाल्याने त्या परिचारिकेने विकृत अधिकाऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून 6 डिसेंबर रोजी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एका वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून परिचारिकेचा शरीरसुखाच्या मागणीसाठी दोन वर्षांपासून छळ झाल्याने त्या परिचारिकेने विकृत अधिकाऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून 6 डिसेंबर रोजी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.या घटनेने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.सध्या परिचारिकेवर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून मृत्यूशी झुंज सुरू आहे.संबंधित परिचारिकेच्या पतीने दोन वर्षांपासून वेतनवाढ रोखून धरल्याचा,सतत दडपशाही करून अश्लाघ्य मागणी करत छळ केल्याचा थेट आरोप वरिष्ठांवर ठेवला आहे.दडपणामुळे त्यांनी उघडपणे अद्याप तक्रार केलेली नाही.
पाच महिन्यांपूर्वी याच अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे मुलचेरा तालुक्यातील पाच डेंगूच्या रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र वरिष्ठांच्य आशीर्वादामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नव्हती, अशी चर्चा आरोग्य वर्तुळात होती. आता या प्रकरणानंतर असंतोषाची लाट अधिक तीव्र झाली आहे. घटनेदिवशी परिचारिकेने दिवसभर कर्तव्य बजावले. सायंकाळी ती मुलचेरा येथे घरी परतली.ती तणावात दिसत होती. पतीने जेवण बनविले, दोघे सोबत जेवले.पतीला डुलकी लागताच तिने विषारी द्रव प्राशन केले. ही बाब निदर्शनास येताच पतीने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.प्रार्थमोचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
परिचारिकेवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. मात्र तिच्या पतीने गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आदिवासीबहुल, नक्षलवादप्रभावित भागात सेवा देणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात कोणावर कारवाई होते, प्रशासन किती कठोर भूमिका घेते आणि वादग्रस्त अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
घटनेनंतर जिल्हा परिषद सीईओ सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी 7 डिसेंबर ची भेट घेतली. यावेळी त्यांनी तिच्या पतीशी संवाद साधला. संपूर्ण घटनाक्रम त्यांनी जाणून घेतला.याबाबत अद्याप आरोग्य विभागाने कुठलाही खुलासा केलेला नाही.
संबंधित परिचारिकेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. उपचार सुरू असल्याने त्यांच्याशी संवाद झाला नाही,पण पतीने चॅटिंगबाबत माहिती दिली आहे. याबाबत शासनाला सविस्तर अहवाल पाठविण्यात येणार आहे. - सुहास गाडे,सीईओ, जिल्हा परिषद गडचिरोली
परिचारिकेवर उपचार सुरू आहेत. त्या बोलण्याच्या स्थितीत नसल्याने अद्याप जबाब घेतलेला नाही. त्यांचे पती तक्रार देऊ शकतात.अधिकाऱ्यांना पाठवून माहिती घेण्यास सांगितले आहे. योग्य ती कारवाई करण्यात येईल. - विनोद चव्हाण ,पोलीस निरीक्षक गडचिरोली

