गडचिरोली जिल्ह्यातील या गावात आहे फक्त एकच घर आहे,जिथे राहतात फक्त 7 लोक.
एस.के.24 तास
धानोरा : महाराष्ट्र मध्ये केवळ एकच घर असलेले आणि फक्त एकाच कुटुंबातील सात लोकसंख्या असलेले गाव असू शकते, याची तुम्ही कल्पना करू शकता का ? पण हे सत्य आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात इरपुंडी नावाचे हे अनोखे गाव आहे.सर्वसाधारणपणे गावात किमान 20 ते 25 घरे,ग्रामपंचायत,अंगणवाडी आणि मध्यभागी मंदिर असते.
पण इरपुंडी गाव पूर्णपणे वेगळे आहे.येथे संपूर्ण गावात फक्त एकच घर असून,त्याच घरात राहणारे जादे कुटुंबातील 7 सदस्य हीच या गावाची एकूण लोकसंख्या आहे.गडचिरोली शहरापासून सुमारे 42 कि.मी.दूर असलेल्या घनदाट जंगलात इरपुंडी वसलेले आहे. तुकुम हे सर्वात जवळचे मोठे गाव असून ते गावापासून पाच कि.मी.अंतरावर आहे.
तुकुम गावापर्यंत पक्का रस्ता आहे,तेथून इरपुंडी पर्यंत चा एक किलोमीटरचा कच्चा रस्ता जंगलातून जातो, तर जादे कुटुंबाच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला आहे.60 वर्षीय यशोदा जादे या या कुटुंबाच्या प्रमुख आहेत. त्यांचे 3 मुले,1 सून आणि 2 नातवंडे याच घरात राहतात. त्यांचा एक मुलगा आणि सून तुकुम जवळ राहतात.
पतीच्या निधनानंतर यशोदा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला,जवळच्या गावातील नातेवाईकांनी त्यांना वेळोवेळी मदत केली.जादे कुटुंबाचा मुख्य आधार शेती आणि पशुपालन आहे.भातशेती,गुरे,शेळ्या आणि कोंबड्या ही त्यांची संपत्ती आहे.दैनंदिन गरजांसाठी हे कुटुंब तुकुम गावावर अवलंबून असते.यशोदा सांगतात की त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून याच गावात राहत आहे.
" आम्हाला कधीच भीती वाटली नाही.लोक वाघ आणि हत्तींना घाबरतात, पण आम्हाला त्यांचा कधीही सामना करावा लागला नाही, " असे त्या म्हणतात.गडचिरोली जिल्ह्याची एक मोठी खासियत म्हणजे येथे कमी लोकसंख्या असलेली गावे आणि पाडे मोठ्या संख्येने आहेत.धानोरा तालुक्यातही 100 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली अशी 35 गावे आहेत.
कमी लोकसंख्या आणि घनदाट जंगलांमुळे प्रशासनासाठी आरोग्य सेवा आणि सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे मोठे आव्हान ठरते.अनेकदा लोक दिवसभर शेतात किंवा जंगलात कामात व्यस्त असल्याने त्यांच्या घरापर्यंत पोहोचणे अधिक कठीण होते.

