ॲम्बुलन्सच्या नावाखाली दारू तस्करीचा पर्दाफाश. 📍आष्टी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त.

ॲम्बुलन्सच्या नावाखाली दारू तस्करीचा पर्दाफाश.


📍आष्टी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त.


एस.के.24 तास 


चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यामध्ये ॲम्बुलन्स सारख्या अत्यावश्यक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा गैरवापर करून अवैध दारूची तस्करी करणाऱ्या टोळीचा आष्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 12 लाख 28 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.


दि.22 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास,आष्टी ते आलापल्ली मार्गावर महात्मा फुले महाविद्यालयाजवळ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. यावेळी एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी ईको क्र.MH.34 BR 5753 ही गाडी,ज्यावर लाल अक्षरात " ॲम्बुलन्स " असे लिहिले होते.संशयावरून थांबवून तपासणी करण्यात आली. 


पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा आढळून आला.यात 4000 देशी दारूच्या निपा,864 बिअरच्या बाटल्या, तसेच रॉयल स्टॅग व ऑफिसर चॉईस ब्लू या ब्रँडच्या महागड्या दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे.


या प्रकरणी सुलतान महोम्मद शेख वय,27 वर्ष व सौरभ चंदू गायकवाड वय,33 वर्ष या दोघांना अटक करण्यात आली आहे.हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून मजुरीचा व्यवसाय करतात.पोलिसांनी सांगितले की,आरोपी कोणत्याही वैध परवान्याशिवाय दारूची वाहतूक करत होते.


त्यामुळे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (अ), 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक मदन मुकुंदराव मस्के यांनी तपासाची सूत्रे हाताळली असून,प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. सध्या पोलिस या प्रकरणातील संपूर्ण नेटवर्कचा तपास करत असून, या मागे आणखी मोठी साखळी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !