कारवाफा - पेंढरी रोडच्या दुतर्फा कडा केव्हा भरणार ? नागरिकांचा प्रशासनाला थेट सवाल.
एस.के.24 तास
धानोरा : गडचिरोली ते पेंढरी या मार्गावरील कारवाफा ते पेंढरी रस्त्याच्या दुतर्फा खोल कडा आणि धोकादायक खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून,स्थानिक नागरिकांनी सरकारला थेट जाब विचारला आहे.“ या कडा नेमक्या केव्हा भरणार ? ” या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच शालेय वाहने प्रवास करतात.
अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला माती वाहून गेल्याने खोल दरीसारखे उतार तयार झाले आहेत.अरुंद रस्त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रकाशयोजने अभावी परिस्थिती आणखी गंभीर बनते. किरकोळ चुक झाली तरी वाहन थेट कडेला घसरून अपघात होण्याची भीती वाहनचालक व्यक्त करत आहेत.स्थानिकांच्या मते, काही महिन्यांपूर्वी या मार्गावर डांबरीकरण झाले.
परंतु रस्त्याच्या दुतर्फा संरक्षणात्मक कडे (शोल्डर) न भरल्याने संपूर्ण काम अपूर्णच राहिले आहे. दर वर्षीच्या पावसाळ्यात माती वाहून गेल्याने कड्यांची खोली अधिक वाढली आहे. परिणामी रस्त्याची रुंदी कमी झाल्याने समोरासमोर येणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करताना मोठा धोका पत्करावा लागतो.नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केल्याचा दावा केला आहे.
अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. “ एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का ? ” असा संतप्त सवालही स्थानिकांनी उपस्थित केला आहे.तज्ञांच्या मते, रस्त्याच्या कडांना तात्काळ मुरूम टाकून समतल करणे,पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करणे आणि धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावणे आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला पांढरा पेंट रिफ्लेक्टर साठी पेंट करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा येत्या काळात अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती नाकारता येत नाही.
दरम्यान, संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने काम सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. कारवाफा - पेंढरी मार्गावरील रस्त्याच्या कडांचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने ठोस वेळापत्रक जाहीर करावे, अशीही मागणी पुढे येत आहे.
सरकारकडून उत्तर काय ?
आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या प्रतिसादाकडे लागले आहे. नागरिकांचा एकच प्रश्न “ आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची,आणि ती केव्हा पूर्ण होणार ? ”

