एटापल्ली तालुक्यात धावत्या दुचाकीने पेट घेतल्याने होरपळून मृत्यू पत्नीच्या डोळ्यादेखत पती आगीच्या विळख्यात.
एस.के.24 तास
एटापल्ली : नात्याच्या गाठी बांधण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर नियतीने घाला घातला. आपल्या नातेवाइकाचे लग्न जुळवून आनंदाने घरी परतत असताना वाटेतच दुचाकीने पेट घेतला अन् यात होरपळून त्यांचा मृत्यू झाला.ही घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा मार्गावर १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
सिमन दसरू हिचामी वय,४२ वर्ष रा.कृष्णार ता.एटापल्ली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.ते १३ मार्च रोजी आपल्या नातेवाइकाचे लग्न जुळवण्यासाठी चंदनवेली येथे गेले होते. लग्न जुळविल्यानंतर जेवण करुन ते चंदनवेली गावावरून आपले काम आटोपून सिमन हे आपल्या दुचाकीने (एमएच ३३ एई - २७३९) घराकडे निघाले होते.
एटापल्ली - बारसेवाडा रोडवर शहरापासून अवघ्या ३ किमी अंतरावर असताना अचानक त्यांच्या दुचाकीने पेट घेतला. काही कळायच्या आत आगीने रौद्र रूप धारण केले आणि सिमन यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण घटनेत त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची भीषणता पाहून एटापल्ली पोलिस आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने तात्काळ धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.धावत्या दुचाकीने अचानक पेट का घेतला ? हा तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा तपास पोलिस करत आहेत.
सिमन यांच्या पत्नी व मुलगा दुसऱ्या दुचाकीवरुन पाठीमागून येत होते, त्यांच्या डोळ्यादेखत पतीला आगीने घेरले होते. पत्नी, मुलाने शर्थीचे प्रयत्न केले, पण आग विझविण्यात यश आले नाही. यानंतर पत्नीने एकच आक्रोश केला, त्यामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.

