वैरागडच्या ऐतिहासिक ठेव्यावर सोन्याच्या हव्यासापोटी घाला ; मध्यरात्री गुप्तधनासाठी खोदकाम..!
एस.के.24 तास
आरमोरी : तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि 'विराट नगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैरागड येथील परिसरात गुप्तधनाच्या लालसेपोटी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऐतिहासिक किल्ल्याच्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास 'कजली' लावून सोन्याचा शोध घेणारे चोरटे सक्रिय झाले असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैरागड किल्ल्यापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या एका जुन्या मंदिराच्या जागेवर १० ते १५ दिवसांपूर्वी अज्ञातांनी ६ ते ७ मोठे खड्डे खोदले. खोदकामाच्या ठिकाणी शेंदूर, कुंकू, नारळ, अगरबत्ती आणि कपडे यांसारख्या वस्तू आढळून आल्या आहेत, ज्यावरून येथे जादूटोणा किंवा गुप्तधनासाठी पूजा करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, खोदकाम करणाऱ्यांनी त्या ठिकाणी शंकराच्या नंदीची मूर्तीही स्थापन केल्याचे दिसून आले.
नागरिकांची मागणी आणि पुढाकार :-
दिनांक,२३ मार्च २०२६ रोजी गावातील एका भाविकाने नवस फेडण्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छता केली असता हा सर्व प्रकार उजेडात आला. वैरागड येथे प्रसिद्ध किल्ला, भंडारेश्वर देवस्थान, गोरजाई मंदिर आणि पाच पांडव देवस्थान यांसारख्या शेकडो ऐतिहासिक वास्तू आहेत. या प्राचीन वारशाचे नुकसान होत असल्याने, पुरातत्व विभाग आणि आरमोरी पोलीस ठाण्याने तातडीने याची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी.
अशी मागणी वैरागड येथील नागरिक आणि भाविकांनी केली आहे. महत्त्वाचे: कारण म्हणजे पुरातन काळी जमिनीत सोने पुरून ठेवल्याच्या अफवांचा फायदा घेऊन चोरटे या ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करत आहेत.

