अहेरी पोलिसांची " खाकीतील माणुसकी " दर्शन वयोवृद्धाचे हरवलेले १३ हजार काही तासांत परत..!
एस.के.24 तास
अहेरी : गडचिरोली पोलीस दलाच्या तत्परतेचा आणि संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अहेरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका वयोवृद्ध नागरिकाची हरवलेली १३ हजार रुपयांची पुंजी अवघ्या काही तासांत शोधून त्यांना सुपूर्द करण्यात आली. ‘पोलीस तुमच्या सेवेत’ या ब्रीदवाक्याची प्रचिती देणाऱ्या या कारवाईमुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवलमरी येथील रहिवासी गट्टू नानाय्या कन्नाबईना हे वयोवृद्ध गृहस्थ ३० एप्रिल रोजी घरगुती साहित्याची खरेदी करण्यासाठी अहेरी येथे आले होते. त्यांनी प्रवासासाठी एका खाजगी बोलेरो पिकअप वाहनाचा आधार घेतला होता. त्यांच्या जवळील १३ हजार रुपयांची रोकड एका निळ्या रंगाच्या पिशवीत होती.अहेरी येथे उतरताना घाईगडबडीत त्यांची ही पिशवी वाहनातच विसरली आणि वाहन पुढे निघून गेले.
त्यानंतर दुपारी १ च्या सुमारास हताश अवस्थेत हे वयोवृद्ध अहेरी पो.स्टे. येथे पोहोचले. तिथे कर्तव्यावर असलेल्या आलापल्ली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) निकिता खेडेकर यांनी त्यांची विचारपूस केली. व वृद्धाची कैफियत ऐकताच खेडेकर यांनी कसलाही विलंब न करता तपासाची चक्रे फिरवली. आणि PSI खेडेकर यांनी ट्रॅफिक विभागाचे ज्ञानेश्वर निलावार (मेजर) यांच्याशी तात्काळ संपर्क साधून वाहनाचे वर्णन दिले.
लगेच ट्रॅफिक पोलिसांनी तातडीने हालचाली करून संबंधित वाहन आलापल्ली–मुलचेरा मार्गावर शोधून काढले. वाहनाची झडती घेतली असता, केबिनमध्ये ती निळी पिशवी सुखरूप आढळली. वाहन चालकाला याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या कार्यतत्परतेचा विजय : -
पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अवघ्या काही तासांत शोधलेली १३ हजारांची रोकड वयोवृद्ध गट्टू नानाय्या यांच्या स्वाधीन करण्यात आली. आपली कष्टाची कमाई परत मिळाल्याचे पाहून वयोवृद्धाच्या चेहऱ्यावर समाधान आणि पोलिसांबद्दल कृतज्ञतेची भावना दाटून आली होती.
“ पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता केवळ गुन्हेगारी रोखण्यापुरती मर्यादित नसून, ती सामान्य नागरिकांच्या अडचणीत धावून जाण्याची त्यांची वृत्ती दर्शवते. PSI निकिता खेडेकर आणि ट्रॅफिक पथकाच्या या कामगिरीमुळे अहेरी पोलिसांची मान उंचावली आहे. ”

