कुंकुमेश्वर स्वामी यात्रास्थळ विकासासाठी ग्रामपंचायतीला लेखी आदेश सर्व मागण्यानुसार सुविधा पुरवण्याचे निर्देश.
एस.के.24 तास
सिरोंचा : तालुक्यातील जाफराबाद, टेकडा (ताला) येथील श्री कुंकुमेश्वर स्वामी यात्रास्थळाच्या विकासासाठी पंचायत समिती, सिरोंचा यांनी ग्रामपंचायतीला लेखी आदेश जारी करत सर्व मागण्यानुसार आवश्यक सुविधा पुरवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सहसचिव तथा एआयवायएफ राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी यात्रेदरम्यान मांडलेल्या मागण्यांची दखल घेत प्रशासनाने ही कार्यवाही केली आहे.
कुंकुमेश्वर स्वामी यात्रा व कल्याण महोत्सवावेळी कॉ. सचिन मोतकुरवार यांनी यात्रास्थळाला भेट देऊन भाविकांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांच्या सोबत कॉ. सुरज जककुलवार (जि. सदस्य) उपस्थित होते. भाकपाचे तालुका सचिव कॉ. रवी बरसांगडी यांच्या निमंत्रणावरून त्यांनी यात्रेत सहभाग घेतला होता.
दौऱ्यादरम्यान नागरिकांनी विविध समस्या मांडल्या होत्या. त्यानुसार कॉ. मोतकुरवार यांनी शासनाकडे किचन शेड, सोलर लाईट, सोलर पाणी पंप, स्वच्छतागृह, रस्ते दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या सर्व मागण्यांसाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला होता.
याच पार्श्वभूमीवर पंचायत समितीने काढलेल्या लेखी आदेशात ग्रामपंचायतीला स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, “वरील सर्व मागण्यानुसार यात्रास्थळी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात”. यात्रास्थळी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी सर्व मूलभूत सुविधा उभारणे अत्यावश्यक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे यात्रास्थळाच्या विकासाला गती मिळणार असून भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ट्रान्सजेंडर बांधवांनी मांडलेल्या समस्याही शासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील,असेही कॉ. मोतकुरवार यांनी स्पष्ट केले.

