भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; आईसह तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू ; तर वडील आणि एक वर्षाचा बालक गंभीर जखमी..! 📍कनेरी नाल्याजवळील घटना...!

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; आईसह तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू ; तर वडील आणि एक वर्षाचा बालक गंभीर जखमी..!


📍कनेरी नाल्याजवळील घटना...!


एस.के.24 तास 


सडक अर्जुनी : कोहमारा - नवेगाव राज्य मार्गावर कनेरी नाल्याजवळ बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत मायलेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात वडील आणि त्यांचा एक वर्षाचा लहान मुलगा गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

         

मिळालेल्या माहितीनुसार,सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी येथील रहिवासी पितांबर प्रकाश लांजेवार (३२) हे आपल्या कुटुंबासह नातेवाइकांकडील कार्यक्रम आटोपून नवेगावबांधकडून स्वगावी परतत होते. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास पितांबर, त्यांची पत्नी शुभांगी आणि दोन मुले दुचाकीने (क्र.म्हणून.35 AM 7348) जात असताना, कोहमाराकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला कनेरी नाल्याजवळ समोरून जोरदार धडक दिली. 


ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये शुभांगी पितांबर लांजेवार (२८) आणि रियांश पितांबर लांजेवार (३) या मायलेकाचा गंभीर दुखापत झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. पितांबर लांजेवार आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा कुशल हे या अपघातात गंभीर जखमी झाले, असून ते थोडक्यात बचावले आहेत.

        

अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने डुग्गीपार पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे वृत्त कोदामेडी गावात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 


एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने लांजेवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला,असून पुढील तपास सुरू आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !