आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे खाजगी शाळेजवळच देशी - विदेशी दारूचा महापूर तर देलनवाडी गावात सुद्धा आला दारूचा ओघ.

आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे खाजगी शाळेजवळच देशी - विदेशी दारूचा महापूर तर देलनवाडी गावात सुद्धा आला दारूचा ओघ.


एस.के.24 तास 


आरमोरी : आरमोरी तालुक्यातील मानापूर शिक्षणाचे पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेच्या हाकेच्या अंतरावरच आता मद्याचे पेले रिते होत असल्याचे धक्कादायक चित्र मानापूर परिसरात पाहायला मिळत आहे. मानापूर येथील एका नामांकित खाजगी शाळेच्या अगदी जवळच देशी आणि विदेशी दारूची अवैध विक्री जोरात सुरू असून,यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर आणि परिसरातील सामाजिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होत आहेत.


तसेच देलनवाडी गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात सकाळी सायंकाळी दारू विक्री खुलेआम केली जाते. जणू काही त्या गावानं दारू विकण्याचा परवाना दिला आहे अशी परिस्थिती आहे.

शाळेचा परिसर बनला अड्डा : - 


नियमानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांची किंवा दारूची विक्री करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, मानापूर येथील या खाजगी शाळेजवळ या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. सकाळपासूनच तळीरामांची वर्दळ येथे वाढलेली असते, ज्याचा थेट त्रास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना आणि महिलांना सहन करावा लागत आहे.


पालकांमध्ये संतापाची लाट : - 

" आम्ही आमच्या पाल्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवतो, मात्र शाळेच्या फाटकापाशीच जर अशा प्रकारे दारू विक्री होत असेल, तर मुलांवर काय संस्कार होणार ? " असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.अनेकदा मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तींकडून अश्लील भाषेचा वापर केला जातो, ज्यामुळे परिसरातील वातावरण दूषित झाले आहे.


पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग सुस्त ?


स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,ही दारू विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, हा मोठा प्रश्न आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. किरकोळ कारवाई करून पुन्हा विक्री सुरू होत असल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणण्याऐवजी ते अधिक निर्धास्त झाले आहेत.


मागणी आणि इशारा : - 


शाळेच्या परिसरातील ही अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि गावातील शांततेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. आता पोलीस प्रशासन या 'नशिल्या' व्यवसायावर लगाम लावणार की डोळेझाक करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !