नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार.

नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार.


एस.के.24 तास 


चंद्रपूर : जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.हरिदास महादेव कुबडे वय,58 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांच्या मृतदेहाचे अवशेष शेतात विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. कुबडे हे शनिवारी 4 एप्रिल रोजी सकाळी मोहफुले वेचण्यासाठी शेतात गेले होते. 

सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.सायंकाळी सुमारे ६ वाजता त्यांचा पुतण्या अक्षय शेतात गेला असता,त्याला वाघ,वाघीण आणि तीन बछडे दिसले.या घटनेने घाबरून त्याने तात्काळ गावात येऊन माहिती दिली.

यानंतर वनविभाग व पोलिसांना कळविण्यात आले. संबंधित पथकाने घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली.काहीही हाती लागले नाही. रविवारी सकाळी पुन्हा शोध घेतल्यावर कुबडे यांचे अवशेष छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले.

यावरून वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिसरात वाघ, वाघीण व त्यांच्या तीन पिल्लांचा वावर असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पुढील तपास सुरू आहे.नागरिकांनी एकटे शेतात न जाण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !