तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांवर रानडुकराचा हल्ला ; 3 जखमी 1 महिला गंभीर..!

तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांवर रानडुकराचा हल्ला ; 3 जखमी 1 महिला गंभीर..!


एस.के.24 तास 


कोरची : कोरची तालुक्यातील बोडेना गावालगतच्या जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांवर एका रानडुकराने अचानक हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला गडचिरोली येथे हलवण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बोडेना गावापासून साधारण ३ किमी अंतरावरील जंगलात मजूर तेंदूपत्ता संकलनाचे काम करत होते. यावेळी एका रानडुकराने मजुरांच्या दिशेने धाव घेत त्यांच्यावर भीषण हल्ला केला.

या हल्ल्यात पुष्पा कालिदास भैसारे वय,४५ वर्ष रा. कोरची या महिलेच्या छातीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या सोबतच नंदकिशोर किशनलाल बोरकर वय,५४ वर्ष रा.भीमपूर यांच्या हाताला, मांडीला व पोटाला जखमा झाल्या आहेत.तर कृष्णा बुधराम पडोटी वय,६१ वर्ष रा.कोरची हे देखील हल्ल्यात जखमी झाले आहेत.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सौ. पुष्पा भैसारे यांची प्रकृती खालावल्याने डॉ.आशिष विटनकर यांनी त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्याचा (रेफर) निर्णय घेतला. 

इतर दोघांवर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत. सध्या संपूर्ण तालुक्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू असून ग्रामीण भागातील शेकडो नागरिक रोज पहाटे जंगलात जातात. वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या मजुरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि जखमींना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !