कार उलटल्यानंतर पेटली ; चालकाचा थरारक बचाव.
एस.के.24 तास
लाखांदूर : दिनांक,29/05/2026 लाखांदूर–वडसा मार्गावरील चपराळ पहाडी परिसरात शुक्रवारी दुपारी भीषण अपघात घडला. चालत्या कारचा समोरील टायर अचानक फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून कार पलटी झाली. अपघातानंतर काही क्षणांतच कारने पेट घेतल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झाले.सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार,मंगेश मधुकर राऊत वय,३३ वर्ष रा. सोनी ता.लाखांदूर जिल्हा.भंडारा हे आपल्या मारुती सुझुकी अल्टो (क्र. MH-33-V-4135) या कारने लाखांदूरहून सोनीकडे जात होते. दुपारी सुमारे 1:45 वाजताच्या सुमारास चपराळ पहाडी परिसरात कारचा समोरील टायर अचानक फुटला.त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्यावर पलटी झाली.
अपघातानंतर काही सेकंदांतच कारच्या इंजिनमधून धूर निघू लागला आणि अचानक आग भडकली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत चालक मंगेश राऊत यांनी तातडीने कारमधून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला.काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण कार ज्वाळांच्या विळख्यात सापडली.
घटनेची माहिती मिळताच नगरपंचायत लाखांदूरच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.

