तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत मोटेगाव जंगल परिसरात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू.

तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत मोटेगाव जंगल परिसरात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू.


एस.के.24 तास 


चिमुर : तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत मोटेगाव जंगल परिसरात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दिलीप जानबा ननावरे वय,45 वर्ष रा.मोटेगाव असे मृताचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वनविभागाच्या माहितीनुसार,मोटेगाव ते पेंढरी मार्गावरील बद्री पहाडी परिसरातील कक्ष क्रमांक 38 मध्ये ननावरे हे नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. सकाळी 10:00. वाजण्याच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर वाघाने मृतदेह सुमारे 500 मीटर अंतरापर्यंत ओढत नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

ननावरे यांच्यासोबत असलेल्या बकऱ्या सैरावैरा पळाल्यानंतर घरी परतल्या.ननावरे घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.प्रतिसाद न मिळाल्याने तो काही मुलांसह जंगल परिसरात शोध घेण्यासाठी गेला. यावेळी घटनास्थळी फाटलेले कपडे आणि कुऱ्हाड आढळून आली. त्यानंतर गावकऱ्यांनी शोधमोहीम राबविल्यानंतर मृतदेह घटनास्थळापासून सुमारे 500 मीटर अंतरावर आढळून आला.

स्थानिकांच्या माहितीनुसार, याच परिसरात सकाळी आठच्या सुमारास वाघ दिसल्याचे काही महिला मजूर तसेच नागरिकांनी सांगितले होते.रोपवाटिकेजवळ रस्ता ओलांडताना वाघ दिसल्याची माहितीही समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार,सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड,वनरक्षक केशव पाटील, संभाजी वडझे, बाळकृष्ण नागरे यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनीही पथकासह भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

मृत दिलीप ननावरे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे मोटेगाव आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या घटनेनंतर वनविभागाने मृताच्या कुटुंबीयांना तातडीची 50 हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली आहे. उर्वरित अनुदानाची रक्कम शासनाच्या नियमानुसार लवकरच देण्यात येईल, अशी माहिती वनविभागाने दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !