रिटायरमेंट नंतर फक्त " अपमान " आणि " एकाकीपण " वाट्याला येणार ; वाचा समाजाचा संतप्त सवाल.

रिटायरमेंट नंतर फक्त " अपमान "  आणि " एकाकीपण " वाट्याला येणार ; वाचा समाजाचा संतप्त सवाल.


एस.के.24 तास 


गडचिरोली : "क्षणभराच्या पैशाच्या हव्यासापोटी लाच खाणाऱ्यांनो,समाजात तुमची खरी इज्जत काय राहणार ? आणि रिटायरमेंट झाल्यावर जेव्हा हातातली सत्ता जाईल,तेव्हा तुम्ही काय करणार ? " असा संतप्त आणि रोकठोक सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये वाढत्या लाचखोरीवर आणि भ्रष्टाचारी प्रवृत्तीवर बोट ठेवणारा हा एक विशेष वृत्तांत.


भीतीपोटी मिळणारा आदर म्हणजे " प्रतिष्ठा "  नव्हे..!


आज अनेक विभागांमध्ये टेबलखालून पैसे घेतल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही,अशी परिस्थिती पाहायला मिळते. लाच घेणारे अधिकारी किंवा कर्मचारी स्वतःला खूप हुशार समजतात.त्यांच्याकडे असलेल्या पदाच्या भीतीपोटी किंवा आपले काम अडकू नये म्हणून नागरिक समोरून कदाचित त्यांना आदर दाखवत असतील ; पण हा आदर नसून निव्वळ भीती आणि स्वार्थ असतो.पाठीमागे अशा व्यक्तींची ओळख केवळ आणि केवळ " लाचखोर " म्हणूनच होते, ही वस्तुस्थिती आहे.


रिटायरमेंट नंतर खऱ्या कर्माची फळे..!


1) नोकरीत असेपर्यंत खुर्चीचा माज आणि अवतीभवती चमच्यांचा गराडा असतो.पण रिटायरमेंटनंतर जेव्हा ही शासकीय खुर्ची निघून जाते, तेव्हा खरी परिस्थिती समोर येते.

2) चमचे आणि स्वार्थी मित्र गायब  निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवसापासून फोन येणे बंद होते.जे लोक मागे - पुढे करायचे,ते रस्त्यात भेटले तरी तोंड फिरवून निघून जातात.

3) पैसा असूनही मनःशांती नाही अनैतिक मार्गाने कमावलेल्या पैशातून मोठी घरे किंवा गाड्या नक्कीच घेता येतात,पण रात्रीची सुखाची झोप आणि मनःशांती कधीच विकत घेता येत नाही.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) टांगती तलवार आणि समाजात उघड पडण्याची भीती आयुष्यभर कायम राहते.

4) पापाची कमाई कोर्ट आणि आजारपणात: अनेकांचा असा अनुभव आहे की, लाचेचा पैसा शेवटी आजारपण, कोर्ट-कचेऱ्या किंवा मुलांच्या चुकीच्या सवयींमुळे वाया जातो.


कुटुंबाला सहन करावा लागतो मानभंग : - 


लाच घेणाऱ्या व्यक्तीच्या कृत्यामुळे त्यांच्या निष्पाप कुटुंबाला, मुलांना समाजात मान खाली घालून जगावे लागते. "बघा, यांचे वडील लाच घेताना पकडले गेले होते," हा शिक्का त्यांच्या पुढील पिढीचेही नुकसान करतो.


प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती..!


आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा माणूस मागे वळून पाहतो, तेव्हा आपण समाजाचे आणि गरिबांचे रक्त शोषून काय कमावले ? हा पश्चात्ताप त्यांना आतून पोखरत राहतो.याउलट,प्रामाणिकपणे नोकरी करून सेवानिवृत्त झालेला व्यक्ती समाजात ताठ मानेने जगतो. त्याला मिळणारा आदर हा मनापासून असतो.


त्यामुळेच आजचा सजग नागरिक लाचखोरांना थेट इशारा देत आहे. " पैशाचा माज नोकरी असे पर्यंतच चालेल,पण रिटायरमेंटनंतरच्या शांततेसाठी आणि खऱ्या इज्जतीसाठी लाचखोरी थांबवा,अन्यथा भविष्यातील अंधार ठरलेला आहे..! "


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !