ब्रम्हपुरी शहरालगत असलेल्या चांदगाव रोडवरील डोंगे घाटात शालेय विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू.
अमरदीप लोखंडे ,सहसंपादक
ब्रह्मपुरी -०२/०६/२६ ब्रह्मपुरी शहरालगत असलेल्या चांदगाव रोड जवळील (नाल्यात) डोंगे घाटावर आज सकाळी हृदयद्रावक मनाला सुन्न करणारी घटना घडली.आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला.
नैतिक अशोक शेंडे वय -१६ वर्ष राह. जानी वार्ड, ब्रह्मपुरी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद कान्हवेंट, स्कूल येथील वर्ग - १० चा विद्यार्थी होता.
त्याच्या या अकाली निधनाने शहरात व सभोवतालच्या परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.प्राप्त माहितीनुसार वनविभागात वनमजूर असलेले अशोक शेंडे यांचा नैतिक हा मुलगा असून नेहमीप्रमाणे तो आज सकाळी ०६-०० वाजता ब्रह्मपुरी येथील क्रीडा संकुलात बास्केटबॉल खेळण्यासाठी गेला होता.
बास्केटबॉल खेळून झाल्यानंतर नैतिक त्याचा मित्र सौम्य अतुल ढोक सम्राट अशोक चौक, ब्रह्मपुरी व जय योगेश राऊत राहणार- नान्होरी हे तिघे सकाळी अंदाजे ७:३० वाजता चांदगाव रोड लगत असलेल्या डोंगे घाटावरती आंघोळ करण्यासाठी गेले.
मी सर्वप्रथम पाण्यात उतरतो त्यानंतर तुम्ही माझ्या मागे या असे सोबतच्या मित्रांना सांगुन नैतिक ने पाण्यात उडी मारली परंतु खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या खोल पाण्यात बुडू लागला.नैतिक पाण्यात पोहतांना न दिसल्यामुळे त्याचा मित्र सौम्य ढोक याने तातडीने नैतिकच्या घरी जाऊन त्याचे वडील अशोक शेंडे यांना नैतिक पाण्यात बुळाल्याच्या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती ऐकताच क्षणाचाही विलंब न करता अशोक शेंडे यांनी डोंगे घाटावरती धाव घेतली.
नैतिक पाण्यात बुडाल्याची घटना ब्रह्मपुरी व आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली.स्थानिक नागरिक व परिसरातील लोकांनी डोंगे घाटावरती धाव घेतली. डोंगे घाटावरती प्रचंड गर्दी उसळली.स्थानिक नागरिक व पोहणाऱ्या तरुणांनी पाण्यात नैतिक चा शोध घेतला तोपर्यंत उशीर झाला होता. नैतिकवर काळाने झडप घातली होती.
घटनेची माहिती अशोक शेंडे यांनी तोंडी रिपोर्ट द्वारे ब्रह्मपुरी पोलीस प्रशासनाला दिली असता पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.क्रीडाप्रेमी असलेल्या व एका उमद्या विद्यार्थ्यांचा अकाली मृत्यू झाल्याने ख्रिस्तानंद कान्हवेंट, स्कूल तथा स्थानिक नागरिक व परिसरात नैतिक विषयी हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
नदी,नाले,अथवा डोंगे घाट येथील खोलगट पाणी असलेल्या ज्या ठिकाणी पाण्याचा अंदाज येत नाही अशा ठिकाणी कुणीही पोहायला जाऊ नये असे पोलीस प्रशासनाने जनतेला आवाहन या प्रसंगी केले.पोलीस प्रशासन योग्य चौकशीपुढील कार्यवाही करीत आहेत.

