आरमोरी तालुक्यात वाळू माफियांचा उच्छाद ; पोकलेनद्वारे बेसुमार उपसा,महसूल यंत्रणेची " अर्थपूर्ण " पाठराखण..!

आरमोरी तालुक्यात वाळू माफियांचा उच्छाद ; पोकलेनद्वारे बेसुमार उपसा,महसूल यंत्रणेची " अर्थपूर्ण " पाठराखण..!


एस.के.24 तास 


आरमोरी : तालुक्यातील वाळूघाटांवर सध्या वाळू माफियांनी उच्छाद मांडला असून, सर्व नियमांना केराची टोपली दाखवत बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. ज्या पद्धतीने हा संपूर्ण काळाबाजार सुरू आहे, त्यावरून स्थानिक महसूल विभागाने वाळू तस्करांना मनमानी कारभाराची खुली सूटच दिली आहे की काय,अशी तीव्र शंका आता उपस्थित केली जात आहे.

वैनगंगा नदीच्या वघाळा घाटावर सध्या कोणतीही भीती न बाळगता थेट पोकलेन मशिन लावून दिवसाढवळ्या वाळूचा उपसा केला जात आहे.अशीच काहीशी गंभीर परिस्थिती देऊळगाव घाटावर ही पाहायला मिळत असून येथे प्रशासनाने आखून दिलेली मर्यादा ओलांडून मोठ्या प्रमाणावर रेती उपसली गेली आहे.या बेकायदेशीर उत्खननामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी धोकादायक आणि अवाढव्य खड्डे निर्माण झाले आहेत. 

देऊळगाव येथील मंडल अधिकारी आणि तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत असलेल्या ‘मधुर’ संबंधांमुळेच हा संपूर्ण गोरखधंदा सुरळीत सुरू असल्याचे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

नियम पाहता घाटांवर आणि साठवणूक (डेपो) केलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे.देऊळगाव घाटावर सीसीटीव्हीची कोणतीही योग्य व्यवस्था नाही.याचाच फायदा घेत नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून दिवस-रात्र वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे,महसूल यंत्रणेने अद्याप येथे साधी भेट देण्याचे किंवा कारवाई करण्याचे सौजन्य दाखवलेले नाही.आता पर्यंत किती ब्रास वाळूचा उपसा झाला.

याची साधी मोजणी किंवा तपासणी करण्याची तसदीही प्रशासनाने घेतलेली नाही. वघाळा घाटाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. यावर्षी ग्रामसभेने वाळू घाटाच्या लिलावाला तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, लोकशाहीत ग्रामसभेच्या अधिकारांना पायदळी तुडवत, गावकऱ्यांचे काहीही ऐकून न घेता महसूल प्रशासनाने थेट लिलाव प्रक्रिया राबवल्याचा खळबळजनक आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

वघाळा (जुना) घाटावर मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन झाल्यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलण्याची भीती निर्माण झाली आहे. हे गाव आधीच पूरप्रवण क्षेत्रात येते. गावाच्या अगदी जवळून वाळू काढल्यामुळे पावसाळ्यात नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने सरकू शकतो. ज्यामुळे संपूर्ण गाव पाण्यात जाण्याचा आणि जीवितहानीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. 

वाळूच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे गावातील रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना तीव्र वायू प्रदूषणाचा आणि श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.या संपूर्ण गंभीर प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, यासाठी वघाळा येथील गावकऱ्यांनी आरमोरी तहसील कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. 

भविष्यात गावात पूर परिस्थितीला सर्वस्वी आरमोरी तहसील प्रशासन जबाबदार राहील,”असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत या अवैध वाळू उपशावर कडक कारवाई न झाल्यास,संपूर्ण वघाळावासीय आपल्या कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन’ करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !