जवान मनोज पाटील लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी बोहल्यावरुन उतरुन थेट सीमेवर रवाना ; पत्नी यामिनी म्हणाली “ माझं कुंकू ऑपरेशन सिंदूरसाठी पाठवलंय ”
एस.के.24 तास
जळगाव : 22 एप्रिलच्या दिवशी पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली.या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याची बाब समोर आली.
त्यानंतर जगभरातून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.दरम्यान पाकिस्तानला भारत काय उत्तर देणार ? याची चर्चा सुरु असतानाच 6 आणि 7 मेच्या रात्री भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं.पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
यानंतर जवानांच्या,सरकारी कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातल्या पाचोरा या ठिकाणी लग्नाच्या सुट्टीवर आलेला जवान मनोज पाटील लग्नाच्या बोहल्यावरुन उतरुन थेट सीमेवर रवाना झाला आहे. त्याच्या पत्नीने माझं कुंकू ऑपरेशन सिंदूरसाठी पाठवल्याचं म्हटलं आहे.
मनोज पाटील आणि यामिनी यांचं 5 मे रोजी लग्न : -
लग्न हा माणसाच्या आयुष्याला वळण देणारा सोहळा असतो. लग्नानंतर सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं सगळेच पाहतात.असंच स्वप्न भारतीय सैन्य दलात असलेल्या मनोज पाटीलने पाहिलं.
मनोज पाटील हे मूळचे जळगावातल्या पाचोऱ्याचे. त्यांचं लग्नही झालं.ज्यानंतर सुट्टी रद्द होऊन नियुक्तीसाठी हजर व्हा असं सांगण्यात आलं. जवान मनोज पाटील यांचे ५ मे रोजी लग्न झाले आणि 8 मे रोजी त्यांना देश सेवेसाठी तातडीने हजर व्हा असा कॉल आला.
देशसेवा करण्यासाठी मनोज पाटील हे नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले. मनोज आणि यामिनी यांचा विवाह 5 मे रोजी पार पडला.त्यानंतर पुढच्या तीन दिवसांत मनोज हे नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले. ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवते आहे असं त्यांच्या पत्नी यामिनी यांनी म्हटलं आहे.
पाचोरा या ठिकाणी मनोज यांचा सत्कार
पाचोरा शहरातील राजीव गांधी कॉलनीत मनोज पाटील यांचा घर आहे. तिथूनच ते रवाना झाले. त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मनोज पाटील हे सैनिक आमच्या गावाची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानींचा खात्मा करूनच विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला.
यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजयसिंग पाटील यांनी देखील मनोज यांचा सत्कार केला.पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील यांना देशाच्या सीमेवर रवाना करतांना आई वडील आणि पत्नी भाऊ सह इतरांचे अश्रू अनावर झाले होते.