गोसेखुर्द धरणाची ९ दारे उघडली ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
एस.के.24 तास
भंडारा : मागील दोन दिवसात जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गोसेखुर्द धरणाच्या ३३ दारांपैकी नऊ दारे आज सकाळी उघडण्यात आली. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गोसेखुर्द धरणाची नऊ दारे अर्धा मीटरने उघडण्यात आली असून ७३०.७४ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय धापेवाडा धरणाची ७ दारे उघडली असून ८९०.९ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वैनगंगा नदीची कारधा येथील धोक्याची पातळी २४५.५० मी असून सध्या पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. गोसेखुर्द धरणाची नऊ दारे उघडल्यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
धरण विसर्ग सूचना : -
गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रण करिता आज ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नऊ वक्रद्वारे खुली करून अंदाजे ५३० क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. दोन्ही जलविद्युत प्रकल्पांचा १७८ क्युमेक्स विसर्ग पकडून एकूण अंदाजे ७०८ क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
त्यामुळे नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने करण्यात आले आहे.